Join us

१० मिनिटांत करा कुरकुरीत मसाला भेंडी फ्राय; सोपी रेसिपी, भेंडी न खाणारेही आवडीनं खातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 15:38 IST

How To Make Crispy Bhindi At Home : कुरकुरीत भेंडी वरण भातासोबत किंवा भाकरीसोबतही उत्तम लागते. कुरकुरीत भेंडीची सोपी रेसिपी पाहूया.

दिवाळीच्या (Diwali 2025) दिवसांत जेवणासोबत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. नेहमीच्याच भाज्यांचा वापर करू तुम्ही नवा ट्विस्ट देत भाज्या बनवू शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी भेंडी उत्तम लागते. कुरकुरीत भेंडीची भाजी करणं एकदम सोपं आहे. नेहमीच्या गिळगळीत भेंडीपेक्षा अशी भेंडीची भाजी रूचकर लागते. कुरकुरीत भेंडी वरण भातासोबत किंवा भाकरीसोबतही उत्तम लागते. कुरकुरीत भेंडीची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Crispy Bhindi Fry)

कुरकुरीत भेंडीसाठी लागणारं साहित्य

भेंडी - २५० ग्रॅम

बेसन - ३-४ मोठे चमचे

तांदळाचे पीठ - २ मोठे चमचे 

लाल तिखट - १ ते १.५ लहान चमचा 

हळद - १/४ लहान चमचा

धणे पावडर - १ लहान चमचा

जिरे पावडर - १/२ लहान चमचा

आमचूर पावडर - १/२ लहान चमचा 

गरम मसाला - १/२ लहान चमचा 

मीठ - चवीनुसार

तेल - तळण्यासाठी

कुरकुरीत भेंडीची सोपी रेसिपी

भेंडी स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने पूर्णपणे पुसून घ्या. भेंडीमध्ये पाण्याचा अंश राहिल्यास ती चिकट होईल. भेंडीची दोन्ही टोकं कापून टाका. त्यानंतर भेंडी उभ्या आणि पातळ आकारात चिरा. मोठ्या भेंडीचे आधी मधून दोन भाग करून नंतर उभे चिरा. एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत चिरलेली भेंडी घ्या.

त्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला. सर्व मिश्रण भेंडीला हलक्या हाताने चांगले मिक्स करा. पाणी अजिबात घालू नका. भेंडीच्या नैसर्गिक ओलसरपणामुळे हे मिश्रण भेंडीला व्यवस्थित चिकटते. मिश्रण एकजीव झाल्यावर १० मिनिटे बाजूला ठेवा यामुळे मसाले भेंडीमध्ये मुरतात.

कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल मध्यम आचेवर चांगले गरम झाले पाहिजे. गरम तेलात, भेंडीचे काप थोडे थोडे करून घाला. एकाच वेळी जास्त भेंडी तळू नका, नाहीतर ती कुरकुरीत होणार नाही. भेंडी मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.  भेंडी तळल्यानंतर ती टिश्यू पेपरवर काढा, ज्यामुळे जास्तीचे तेल शोषले जाईल.

गरमागरम कुरकुरीत भेंडी तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करा.भेंडी पूर्णपणे कोरडी करणे सर्वात महत्वाचे आहे, ज्यामुळे ती चिकट होणार नाही. अधिक कुरकुरीतपणासाठी तांदळाच्या पिठाचे प्रमाण थोडे वाढवू शकता. तुम्ही ही भेंडी कमी तेलात शॅलो फ्राय किंवा एअर फ्रायरमध्ये देखील बनवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Masala Bhindi Fry in 10 Minutes: Easy Recipe

Web Summary : Make crispy bhindi fry in minutes! This simple recipe uses readily available ingredients. Besan and rice flour create the perfect crunch. Enjoy as a side or snack.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.