Bottle Gourd Peel Chutney : आपण जर पाहिलं तर बरेच लोक दुधी भोपळ्याची भाजी किंवा तिचे इतर पदार्थ पाहिले तर नाक मुरडतात किंवा तोंड वाकडं करतात. बरं हा मुद्दा जाऊद्या, पण जर घरात दुधी भोपळ्याची भाजी केली असेल तर जास्तीत जास्त लोक त्याची साल काढतात आणि फेकता. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, दुधी भोपळ्याच्या सालीचे सुद्धा भरपूर फायदे मिळतात. पण या सालांपासून तुम्ही एकदम चविष्ट आणि हेल्दी चटणी तयार करू शकता. चला, या चटपटी चटणीची रेसिपी जाणून घेऊया…
दुधीच्या सालींची चटणी – साहित्य
1 कप स्वच्छ धुऊन कापलेल्या दुधीच्या साली
2 हिरव्या मिरच्या
थोडसं आलं
4–6 लसणाच्या पाकळ्या
½ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
1 चमचा लिंबाचा रस
2–4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा तेल
कशी बनवायची चटणी?
एका पॅनमध्ये तेल गरम करा. गरम तेलात जिरे आणि हिंग टाकून छान फोडणी द्या. नंतर त्यात दुधीच्या साली, हिरवी मिरची, किसलेलं आलं, लसूण हे सगळं घालून साधारण 4 मिनिटे परतून घ्या. साली थोड्या मऊ झाल्या की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. हे थंड झालेले मिश्रण मिक्सर जारमध्ये घाला. त्यात मीठ, लिंबूरस आणि कोथिंबीर घालून छान बारीक वाटून घ्या.
पौष्टिक आणि चविष्ट
दुधीच्या सालींची ही चटणी पोषक तत्वांनी भरलेली असून अतिशय चविष्ट लागते. आपण ही चटणी चपाती, पराठे, डाळ-भातासोबत किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. घरातील सगळ्यांनाच या चटपटी चटणीचा स्वाद नक्कीच आवडेल.
