Join us  

गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं; तोंडाला चव आणते, तब्येतीला 4 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 4:36 PM

How to Make Carrot Radish Pickle: लोणचं फक्त चवीसाठी नाही तर तब्येत जपण्यासाठीही खावं. आरोग्यदायी लोणच्यांमध्ये गाजर मुळ्याचं एकत्रित लोणचं खाण्याला महत्त्वं आहे. झटपट होणारं हे लोणचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि बिघडलेली पचनक्रियाही सुधारतं.

ठळक मुद्देगाजर मुळ्याच्या लोणच्यात पचन सुलभ करणारे फायबर मोठ्या प्रमाणात असतात. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गाजर मुळ्याचं लोणचं हिवाळ्यात अवश्य खावं असं तज्ज्ञ सांगतात. गाजर मुळ्याप्रमाणेच या लोणच्यासाठी वापरला जाणारा मसाला आरोग्यास फायदेशीर ठरतो. 

How to Make Carrot Radish Pickle:  लोणचं म्हणजे कैरी, मिरची आणि लिंबू एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. थंडीत तर ताज्या, चटकमटक आणि पौष्टिक लोणच्यांची रेलचेल असते. भाज्यांचं लोणचं हे झटपट होतं  आणि चविष्ट लागतं. झटपट आणि चटकमटक लोणच्यातला एक प्रकार केवळ चटपटीत लागतो असं नाही तर तो पौष्टिकही असतो. गाजर-मुळ्याचं एकत्रित लोणचं. 

Image: Google 

हिवाळ्यात गाजर मुळा आपण सॅलेडमधे खातोच. शिवाय गाजराची भाजी, मुळ्याची स्वतंत्र भाजी, एकत्रित भाजीही छान लागते. तसंच गाजर-मुळ्याचं एकत्रित लोणचंही. गाजर मुळ्याचं लोणचं म्हणजे तोंडाला चव  आणणारा, तब्येत जपण्यास उपयोगी पडणारा चटपटीत प्रकार आहे. गाजर मुळा चवीन खाण्यासाठी हा लोणच्याचा प्रकार फायदेशीर ठरतो. यामुळे गाजर आणि मुळ्यामधील पोषक घटक एकत्रितरित्या पोटात जातात आणि त्याचा फायदा आरोग्यास होतो. शिवाय हे लोणचं बनवताना तयार केला जाणारा मसालाही गाजर मुळ्याच्या लोणच्याला चविष्ट आणि आरोग्यदायी बनवतो.

Image: Google

गाजर मुळ्याचं लोणचं का खावं?

1. गाजर मुळ्याचं लोणचं खाण्याला आरोग्याच्या फायद्याचं परिमाण आहे. या लोणच्यामधून गाजर आणि मुळ्यात असलेले पोषक घटक एकत्रितरित्या पोटात जातात.

2. गाजरामधे जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. तसेच गाजरात कर्बोदकं, फायबर, प्रथिनं, अ आणि क जीवनसत्त्वं, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. शिवाय गाजरामधे नैसर्गिक साखर आणि सोडियम देखील असतं. गाजरामधील बीटा केरोटिन हा घटक आरोग्यास फायदेशीर असतो. गाजर मुळ्याच्या लोणच्यामधून गाजरात असलेले पोषणमूल्यं शरीरास मिळतात. 

3. मुळ्यामधेही गाजराप्रमाणे भरपूर पोषक घटक असतात. मुळ्यात प्रथिनं, अ आणि ब जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, फाॅस्फरस ही खनिजं भरपूर प्रमाणात असतात. शिवाय मुळ्यामधे कर्बोदकं, ऊर्जा, फायबर आणि पाणीही असतं. कच्चा मुळा खाणं जेवढं फायदेशीर असतं तितकाच तो भाजी, पराठा, कोशिंबीर आणि लोणचं या स्वरुपात खाल्ल्यास चविष्ट लागतो आणि पोषक ठरतो. 

Image: Google

4. गाजर मुळ्याच्या लोणच्यामधे फायबरचं प्रमाण भरपूर असतं. या लोणच्यात असलेल्या घटकांमुळे इन्शुलिन निर्मिती नियंत्रित राहाते. त्यामुळे मधुमेहाचा धोका टाळायचा असल्यास हा लोणच्याचा चांगला फायदा होतो. 

5.  हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे वरचेवर सर्दी, खोकला तर होतोच आणि छोट्या मोठ्या आजारांच्या संसर्गाचा धोकाही जास्त असतो. गाजर मुळ्याच्या लोणच्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कारण या लोणच्यातून क जीवनसत्त्वं मिळतं. हे जीवनसत्त्वं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. गाजर आणि मुळ्याच्या एकत्रित सेवनानं लहान मोठ्या आजारांचा धोका सहज टाळता येतो. 

Image: Google

6. गाजरामध्ये केरोटिन आणि अ जीवनसत्त्व असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे दोन्ही घटक फायदेशीर असतात. तसेच मुळ्यातील गुणधर्मही दृष्टी सुधारण्यास मदत करतात.  गाजर् मुळ्याचं लोणचं हिवाळ्यात नियमित स्वरुपात खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्यांचा धोका टळतो.

7. पचनक्रिया सुधारण्यास हे लोणचं मदत करतं. कारण गाजर मुळ्याच्या लोणच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. हे लोणचं खाल्ल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. 

Image: Google

कसं करायचं गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं?

गाजर मुळ्याचं चटपटीत लोणचं तयार करणं अतिशय सोपं आहे. एकदा करुन ठेवलं तर हिवाळ्याच्या चार महिन्यात ते व्यवस्थित टिकतं. किंवा दर आठ्वड्याला थोडं थोडं करुन ताजं ताजं खाल्लं तरी चालतं. 1 मध्यम आकाराचं गाजर आणि 1 मध्यम आकाराचा मुळा यांचं एकत्रित लोणचं करण्यासाठी पुढीलप्रमाणे साहित्य घ्यावं.  1मध्यम आकाराचं गाजर, 1 मध्यम आकाराचा मुळा यांचे उभे मध्यम जाडीचे काप करावेत. 2-3 हिरव्या मिरच्यांचे उभे काप, थोडा हिंग, चवीपुरतं मीठ, 2 चमचे आमचूर पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मेथी दाणे, 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 2 चमचे बडिशेप एवढं जिन्नस लोणच्यासाठी घ्यावं. 

गाजर मुळ्याचं लोणचं करताना आधी गाजर मुळा स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्यावा. सालं काढून गाजर मुळ्याचे मध्यम जाडीचे उभे काप करावेत. कढई गॅसवर गरम होण्यास ठेवावी. आधी मोहरी टाकून ती कोरडीच पण खरपूस भाजावी. ती भाजत आली की त्यात मेथी दाणे टाकावेत. मेथी दाणे परतले गेले की त्यात जिरे, धने , बडिशेप घालून हे सर्व जिन्नस काही सेकंद परतून घ्यावं.  मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करुन घ्यावा. 

कढईत अर्धा कप मोहरीचं तेल घालावं. ते गरम झालं की त्यात थोडा हिंग घालावा आणि लगेच  मिरच्यांचे तुकडे घालावेत. ते तळले गेले की लगेच गाजराचे काप घालावेत. ते तेलात एकदा हलवले की मुळ्याचे काप घालावेत. मिरची, गाजर, मुळा 5 मिनिटं मंद आचेवर तेलात तळावा. हे सर्व नीट तळलं गेलं की त्यात हळद, लाल तिखट, आमचूर पावडर घालून  ते नीट हलवून मिसळून घ्यावं. नंतर त्यात मिक्सरमधे वाटलेला मसाला घालावा. तो नीट मिसळला गेला की चवीपुरतं मीठ घालावं. पुन्हा सर्व नीट एकत्र करुन गॅस बंद करावा. गाजर मुळ्याचं हे चटपटीत लोणचं भाजी, भाकरी, धपाटे, दशम्या, धिरडे यासोबत छान लागतं. खिचडी-पुलाव केल्यास तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना