दिवाळी म्हणजे फराळाचा खमंग सुगंध आणि चटपटीत पदार्थांची मेजवानी! दिवाळीच्या फराळामध्ये गोडासोबतच तिखट, चटपटीत, मसालेदार पदार्थ देखील तितक्याच आवडीने खाल्ले जातात. चिवडा, करंजी, लाडू सोबतच चटपटीत आणि कुरकुरीत 'आलू भुजिया शेव' खायला सगळयांनाच आवडतात. ही शेव चहा,कॉफीसोबत किंवा साध्या चिवड्यामध्ये मिसळून खाण्यासाठी देखील एकदम परफेक्ट असते. बाजारातून विकत घेतलेली शेव जितकी कुरकुरीत आणि चटपटीत लागते, तितकी घरची नेहमी होत नाही असं अनेकांना वाटतं. पण योग्य साहित्य, अचूक प्रमाण आणि काही खास टिप्स माहित असतील तर घरच्या घरी बनवलेली आलू भुजिया शेव देखील अगदी विकतसारखी कुरकुरीत आणि चविष्ट तयार होते(How To Make Alu Bhujiya At Home).
बाजारात मिळणाऱ्या शेवेत प्रिझर्व्हेटिव्ह्ज, सोडा आणि कृत्रिम रंग वापरलेले असतात यासाठीच, घरच्याघरीच ही शेव तयार करणे कधीही उत्तम... खरंतरं, विकत मिळते तशी चटपटीत, कुरकुरीत आलू भुजिया शेव घरीच तयार करणं अगदी सोपं आहे. यंदाच्या दिवाळीत फराळात या 'आलू भुजिया शेव' नक्की करुन पाहा... परफेक्ट आणि विकतच्या शेवसारखी कुरकुरीत आलू भुजिया शेव (Alu Bhujiya Recipe) तयार करण्याची भन्नाट रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. बटाटे - ४ ते ५
२. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
३. धणेपूड - १/२टेबलस्पून
४. गरम मसाला - १/४ टेबलस्पून
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
६. हळद - १/४ टेबलस्पून
७. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
८. बेसन - ५०० ग्रॅम
९. मीठ - चवीनुसार
१०. तेल - तळण्यासाठी
११. चाट मसाला - १ टेबलस्पून
१२. पाणी - गरजेनुसार
दिवाळीचा फराळ झटपट होण्यासाठी खास टिप्स! गडबड - गोंधळ न होता, पदार्थ न बिघडता करा झटकेपट पदार्थ...
कृती :-
१. नेहमीप्रमाणे बटाटे उकडवून घेतो तसे कुकरमध्ये बटाटे उकडवून घ्यावेत.
२. उकडून घेतलेल्या बटाट्यांच्या साली काढून बटाटे किसणीवर किसून घ्यावेत.
३. मग या बटाट्याचा किस एका मोठया परातीत काढून घ्यावा. मग एक चहाची गाळणी घेऊन त्यात आमचूर पावडर,धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, कसुरी मेथी, मीठ असे सगळे जिन्नस एकत्रित घालुन मसाले गाळून घ्यावेत. मग बटाट्याचा किस आणि हे मसाले एकत्रित कालवून घ्यावे.
४. आता या मिश्रणात बेसन घालून शेवसाठीचे पीठ मळून घ्यावे.
५. पीठ अर्धे मळून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे.
६. आता शेव पडण्याच्या साच्याला आतून थोडे तेल लावून घ्यावे, मग यात तयार पिठाचा गोळा घालावा.
७. कढईत तेल गरम करुन त्यात शेव सोडून व्यवस्थित खरपूस तळून घ्याव्यात. शेव थोडी थंड झाल्यावर हाताने मोडून त्याचे बारीक तुकडे करावेत.
८. या तुकड्यांवर हलकासा चाट मसाला भुरभुरवून घ्यावा.
विकतसारखी चटपटीत, कुरकुरीत आलू भुजिया शेव खाण्यासाठी तयार आहे.