हल्ली पोहे, उपमा असे आपले पारंपरिक पदार्थ खाण्याचीही कित्येकांना भीती वाटते. कारण त्या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, मधुमेह असे त्रास वाढतील का अशी शंका मनात येते. शिवाय कित्येक आहारतज्ज्ञही त्यांच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असणारे पदार्थ या यादीतून आपले पोहे, उपमा हे पारंपरिक पदार्थ वगळून टाकतात. म्हणूनच या पदार्थांची पौष्टिकता वाढविण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूया.. उपमा करताना जर त्यात थोडे बदल केले तर नक्कीच त्याची पौष्टिकता तर वाढेलच पण चवही अधिक खुलेल. बघा त्यासाठी काय करायचं...(how to maka rava upma or suji upma more healthy?)
उपमा जास्त पौष्टिक होण्यासाठी काय करावं?
१. उपमा करताना सामान्यपणे तो तेलाची फोडणी देऊन केला जातो. पण त्याऐवजी तुम्ही तुपाची फोडणी घालून उपमा करून पाहा. तेलाच्या तुलनेत तूप जास्त चांगलं आणि शिवाय तुपामुळे त्याची चवही अधिक खुलते.
२. उपमा करताना फोडणीमध्ये अगदी थोडीच उडीद डाळ टाकली जाते. तिचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता. त्यामुळे प्रोटीन्स जास्त प्रमाणात पोटात जातील.
३. मुगाची डाळ मिक्सरमधून रव्याप्रमाणे थोडी बारीक करून घ्या. उपमा नुसता रव्याचा करण्याऐवजी एक कप रवा असेल तर पाव कप भरडलेली मुगाची डाळ असं प्रमाण घेऊन त्याचा उपमा करा. उपम्यामधले प्रोटीन्स वाढतील.
४. आता उपमा पचायला सोपा व्हावा म्हणून त्याच्यातलं फायबर वाढवायला हवं. यासाठी उपम्यामध्ये कांदा, टोमॅटो या नेहमीच्या भाज्या तर घालाच पण त्यासोबतच पत्ताकोबी, सिमला मिरची, कॉर्न, गाजर, बीन्स, मटार, ब्रोकोली, फ्लॉवर या भाज्याही घाला. उपमा जास्त पौष्टिक आणि चवदार होईल.
