दिवाळी हा आनंद आणि प्रकाशाचा सण मानला जातो. सर्वजण आपलं घर सुंदरपणे सजवतात आणि स्वच्छ करतात. छान छान दिवे लावले जातात आणि प्रियजनांना मिठाई किंवा भेटवस्तू दिल्या जातात. याच दरम्यान दिली जाणारी मिठाई तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते. सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते आणि हे विष चुकून आपल्या घरी देखील पोहोचू शकतं. भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची आणि हा धोका कसा टाळायचा हे जाणून घेऊया....
स्वस्त मिळतं म्हणून बरेच लोक रस्त्यावरील दुकानांमधून मिठाई खरेदी करतात, परंतु असं करणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. या दुकानांमध्ये स्वच्छतेच्या समस्यांपासून ते भेसळीपर्यंत अनेक धोके असतात. नेहमी चांगल्या आणि स्वच्छ दुकानातून मिठाई खरेदी करा. ज्या दुकानाबाबत तुम्हाला थोडासाही संशय येत असेल अशा दुकानापासून दूर राहा.
कशी केली जाते भेसळ?
सर्वात आधी मिठाईत नेमकी कशी भेसळ केली जाते ते समजून घ्या. सणांच्या काळात मिठाईच्या मागणीमुळे, निष्कृष्ट दर्जाचा मावा, केमिकल असलेले कलर, सिंथेटिक डेअरी प्रोडक्ट आणि पाम तेल यांसारखे घटक जोडले जातात. कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. ही भेसळ तुम्हाला आजारी बनवू शकते आणि ती विषापेक्षा कमी नाही.
भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची?
- जर एखाद्या मिठाईत जास्त कलर दिसत असेल तर ती घेणं टाळा, कारण त्यात केमिकल असलेले कलर असू शकतात.
- मिठाईत काय वापरलं आहे हे सहसा वास घेतल्यावर कळतं. जर ते पाम तेल किंवा डालडा वापरून बनवलं असेल तर त्याचा वास थोडा वेगळा येईल.
- तुम्ही मिठाई तुमच्या हातावर ठेवून देखील तपासू शकता. जर हाताला भरपूर तेल लागत असेल तर ती तुपाने बनवलेली नाही
- मिठाईची चव घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर ती आंबट लागत असेल किंवा वेगळी चव लागत असेल तर घेऊ नका.
- तुम्ही गरम पाण्यात मिठाई ठेवून देखील ती तपासू शकता. जर मिठाईचा रंग बदलला किंवा फेस आला तर ती भेसळयुक्त मिठाई आहे.