रताळे हा पदार्थ खरोखरच पौष्टिक असतो. आता आपण त्याचे वेगवेगळे फायदे ऐकत आहोत. आपल्या आहारात नियमितपणे रताळे असायलाच हवेत असं आहारतज्ज्ञही सुचवत आहेत. त्याचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यामुळे हल्ली रताळे नियमितपणे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आषाढी एकादशी, महाशिवरात्र अशा मोठ्या उपवासांना तर हमखास घरोघरी रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ केलेच जातात. त्यानिमित्ताने रताळ्याची मागणीही खूप वाढलेली असते. आता मागणी वाढली की ती पुरविण्यासाठी मग व्यापारी लोक अनेक पर्याय शोधून काढतात. त्यातूनच मग भेसळीची सुरुवात होते (How to check the purity of sweet potato?). अशीच भेसळ आता रताळ्यांमध्येही होत असून महाशिवरात्रीच्या दिवशी रताळे घेणार असाल त्यांची शुद्धता नक्कीच तपासून घ्या.(how to identify adulteration in sweet potato?)
रताळ्यांमधली भेसळ कशी ओळखावी?
भेसळीचे किंवा केमिकल्सचा मारा केलेल्या ज्या काही भाज्या किंवा फळं असतात त्या नेहमीच जास्त चकचकीत, आकर्षक दिसतात. त्यामुळे मग ग्राहकांनाही त्या घेण्याचा मोह होतो. असंच काहीसं रताळ्याच्या बाबतीतही केलं जात आहे.
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फक्त १० मिनिटांचा उपाय, अभ्यासातून समोर आली महत्त्वाची माहिती..
फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार रताळ्यांना आकर्षक, चमकदार गुलाबी रंग येण्यासाठी त्यावर रोडामाईन बी हा रंग मारला जात आहे. हा रंग कपड्यांसाठी, कागदांसाठी तसेच शाई तयार करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये वापरला जातो. तो मानवी शरीराच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. रताळ्यांवर हा रंग फवारण्याचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे.
त्यामुळे रताळ्यांची खरेदी करताना त्याच्या चमकदार गुलाबी रंगाला भुलून जाऊ नका. तुम्ही घेतलेलं रताळं शुद्ध आहे की त्यावरही रोडामाईन मारलेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी कापसाचा एक बोळा घ्या. तो पाण्यामध्ये बुडवा आणि त्याने रताळे पुसा.
जर कापसाचा रंग बदलून तो हलका जांभळट, गुलाबी झाला तर ते रताळे भेसळीचे आहे. त्यामुळे रताळे आणल्यानंतर ते काही तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्याचे वरचे आवरण चोळून चोळून स्वच्छ करा. आणि मगच पुन्हा एकदा खात्री करूनच रताळे खा.
