Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी डाळ कमी पडते तर कधी भात जास्त होतो? रोजच्या जेवणाचे योग्य प्रमाण ... रोजच्या वरण भाताचे प्रमाण परफेक्ट कसे ठरवाल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2026 15:08 IST

How To Decide The Right Quantity Of Food For Everyday Cooking?, kitchen tips : जेवण बनवताना योग्य प्रमाण कसे घ्यावे, पाहा टिप्स .

दररोज स्वयंपाक करताना किती तांदूळ घ्यायचे?, डाळ किती पुरेल?, साबुदाणा किती भिजवायचा? असे प्रश्न अनेकांना पडतात. विशेषतः दोन माणसांसाठी स्वयंपाक करताना कधी पदार्थ कमी पडतो तर कधी खूप उरतो. पण अचानक अनेक लोक आले की अंदाज पटकन लावता येत नाही. त्यामुळे दोन माणसांनुसार प्रमाण कसे घ्यावे पाहा. त्यानुसार कितीही लोकांचा अंदाज लावता येतो. (How To Decide The Right Quantity Of Food For Everyday Cooking?, kitchen tips)योग्य प्रमाण माहीत असेल तर अन्नाची नासाडी टाळता येते आणि स्वयंपाकही सोपा होतो. काही रोजच्या पदार्थांसाठी साधारण किती धान्य किंवा मुख्य जिन्नस घ्यावा याची माहिती उपयोगी ठरू शकते.

दोन माणसांसाठी साधा भात करायचा असेल तर साधारण एक कप तांदूळ पुरेसा होतो. हा भात आमटी, भाजी किंवा दहीसोबत आरामात पुरू शकतो. जर खाणाऱ्यांची भूक जास्त असेल तर थोडे अधिक तांदूळ घेता येतात. आमटीसाठी साधारण अर्धा कप तूरडाळ दोन जणांसाठी पुरेशी ठरते. डाळ शिजल्यानंतर त्यात पाणी घालून आमटी तयार केल्यामुळे प्रमाण वाढते.

मुगाची खिचडी किंवा साधी डाळ-तांदळाची खिचडी करताना अर्धा कप तांदूळ आणि पाव कप मूगडाळ हे प्रमाण योग्य मानले जाते. खिचडी शिजल्यानंतर फुलते त्यामुळे हे प्रमाण दोन जणांसाठी पुरेसे ठरते. काही जण खिचडीत भाज्याही घालतात, त्यामुळे ती अधिक पौष्टिक आणि पोटभर होते.

साबुदाणा खिचडीसाठी साधारण दीड कप साबुदाणा दोन माणसांसाठी पुरतो. साबुदाणा भिजवल्यानंतर त्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुरुवातीलाच जास्त घेण्याची गरज नसते. त्यात शेंगदाण्याचं कूट, बटाटा आणि मिरची घातल्यामुळे वाढतो.

उपम्यासाठी एक कप रवा दोन जणांसाठी योग्य ठरतो. पोहे करताना दीड ते दोन कप पोहे पुरतात. पोहे धुतल्यानंतर आणि फुलल्यानंतर त्याचे प्रमाण वाढते. थालीपीठासाठी साधारण एक ते दीड कप भाजणी घेतली तर दोन जणांसाठी व्यवस्थित थालीपीठ तयार होऊ शकते. जर चपाती-भाजीचा स्वयंपाक असेल तर दोन माणसांसाठी साधारण दीड ते दोन कप कणीक पुरेशी ठरते. प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे हे प्रमाण थोडेफार बदलू शकते. 
काही घरांमध्ये भात जास्त खाल्ला जातो तर काही ठिकाणी पोळी जास्त खाल्ली जाते, त्यामुळे अनुभवातून स्वतःच्या घराचं योग्य प्रमाण ठरवता येतं. योग्य प्रमाणात स्वयंपाक केल्यास अन्न वाया जात नाही आणि रोजचा स्वयंपाकही कमी त्रासदायक वाटतो. सुरुवातीला मोजून साहित्य घेण्याची सवय लावल्यास पुढे अंदाज आपोआप येऊ लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Cooking for Two: Perfect Food Portions to Reduce Waste

Web Summary : Struggling with food portions? This guide offers simple measurements for cooking rice, lentils, khichdi, and upma for two people. Avoid food waste with these easy tips and make cooking easier every day.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससोशल व्हायरल