वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी लोक सहसा आहार आणि जीवनशैलीत मोठे बदल करण्यावर लक्ष देतात. मात्र, आपल्या जेवण करण्याच्या पद्धतीतील एक साधी सवय म्हणजे अन्नाचा घास व्यवस्थित खाणे. दीर्घायुष्य आणि वजन नियंत्रणासाठी एक अत्यंत प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. खाताना आपण प्रत्येक घास किती वेळा चावतो. याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर आणि शरीराच्या वजनावर होत असतो. (How Many Times Chew Each Bite Of Food For Healthy long Life Weight Loss)
एक घास कितीवेळा चावून खावा?
अन्नाचा घास कितीवेळा चावून खावा. यासाठी कोणताही कठोर नियम नाही. कारण हे तुम्ही खात असलेल्या पदार्थाच्या प्रकारावर आणि तुमच्या वैयक्तिक सवयींवर अवलंबून असते.पण तज्ज्ञ प्रत्येक घास साधारणपणे ३० ते ४० वेळा चावण्याचा सल्ला देतात. यामुळे अन्नाचे छोटे छोटे कण होतात आणि अन्न गिळण्यास तसेच पचनासाठी सोपे होते. अशा प्रकारे व्यवस्थित चावलेले अन्न शरीराला त्यातील आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करते.
वजन नियंत्रणात अन्न चावून खाण्याची भूमिका
जेव्हा आपण घाईघाईत जेवण करतो आणि अन्न व्यवस्थित चावत नाही तेव्हा आपण नकळतपणे शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो, ज्यामुळे वजन वाढते.संशोधनातून असे दिसून आले आहे की,जे लोक प्रत्येक घास ४० वेळा चावतात ते केवळ १५ वेळा चघळणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे १२ टक्के कमी अन्न खातात. अन्न हळू हळू आणि व्यवस्थित चावल्यानं खालील महत्त्वाचे फायदे होतात.ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.
जेव्हा आपण हळू खातो, तेव्हा पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचायला पुरेसा वेळ मिळतो. मेंदूला हा संकेत मिळाल्यावर, आपण आपोआपच जास्त खाणे थांबवतो. जास्त वेळा चघळल्याने शरीरात जाणारे एकूण कॅलरीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. वजन नियंत्रणाव्यतिरिक्त,अन्नाचा घास योग्य प्रकारे चघळल्याने शरीराला इतर अनेक फायदे मिळतात.
चावणे ही पचनाची पहिली पायरी आहे. चावताना तोंडातून पाचक लाळ येते, ज्यामुळे पचनक्रिया तोंडापासूनच सुरू होते. यामुळे पचनसंस्थेवरील भार कमी होतो. अन्न पूर्णपणे बारीक झाल्यामुळे पचनसंस्थेला त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक प्रभावीपणे शोषून घेणे शक्य होते. चांगले पचन आणि नियंत्रित वजन हे दोन्ही घटक दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहेत.