चपाती हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग आहे. त्याशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. अनेक लोकांचं चपातीशिवाय पोट भरतच नाही. मात्र आजकाल धकाधकीच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक चपाती खाणं टाळतात. डाएटीशियन स्वाती सिंह यांच्या मते, जर चपाती योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली तर ती शरीराला अनेक फायदे देऊ शकते, ज्यामध्ये वजन कमी करण्याचा देखील समावेश आहे. चपाती खाण्याचे फायदे आणि एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात ते जाणून घेऊया...
एका चपातीमध्ये किती कॅलरीज?
भारतीय घरांमध्ये दररोज बनवली जाणारी चपाती ही कार्बोहायड्रेटचा एक साधा सोर्स आहे. मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीमध्ये साधारणपणे १०४ कॅलरीज असतात. जर तुम्ही १०० ग्रॅम गव्हाच्या पिठाची चपाती खाल्ली तर तुम्हाला अंदाजे ३४० कॅलरीज मिळतात. जर तुम्ही चपातीला तूप किंवा तेल लावलं तर सुमारे २५ कॅलरीज वाढतात. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीपासून बनवलेल्या भाकरीमध्ये कॅलरीज कमी असतात.
रात्री किती चपात्या खाव्यात?
डाएटीशियन स्वाती सिंह यांच्या मते, जर लोक दिवसा व्यवस्थित जेवत नसतील तर ते रात्री जास्त खातात, ज्यामुळे वजन वाढतं, रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. जास्त चपाच्या खाल्ल्याने पचायला त्रास होऊ शकतो. महिलांनी रात्री दोनपेक्षा जास्त चपात्या खाऊ नयेत, तर पुरुषांसाठी तीन रोट्या योग्य आहेत. याव्यतिरिक्त, तुम्ही दुपारच्या जेवणात चपात्यांची संख्या वाढवू शकता, परंतु रात्री हलका आहार सर्वात फायदेशीर आहे.
वजन नियंत्रित करण्यासाठी खाण्यातून मिळालेल्या कॅलरीज आणि खर्च केलेल्या कॅलरीजमध्ये संतुलन राखणं महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बसून काम करत असाल तर चपात्यांची संख्या कमी करणं चांगलं. परंतु जर तुम्ही नियमितपणे चालत असाल, व्यायाम करत असाल आणि संतुलित आहार घेत असाल तर चपात्या तुमच्या शरीरासाठी ऊर्जा आणि पोषणाचा एक उत्कृष्ट सोर्स आहे.
