लहान मुलांना खायला काय द्यायचे हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. लहान मुलांना दुधातून खायला अनेक पॅकेट फुड्स आपण वापरतो. मात्र ते आरोग्यासाठी तेवढेसे चांगले नाहीत. त्याऐवजी घरीच तयार केलेले पदार्थ वापरणे जास्त उपयुक्त ठरेल. (Homemade and delicious protein powder recipe for children, no side effects!)घरी ही अशी पूड तयार करा आरोग्यासाठी ती फार पौष्टिक आहे. पाहा कशी करायची.
साहित्य नाचणी, ज्वारी, बाजरी, ओट्स, बदाम, काजू, सुकं खोबरं, वेलची पूड, जायफळ पूड, अक्रोड, खारीक
कृती १. सगळी पिठं समप्रमाणात घ्यायची. नाचणीचे पीठ अर्धी वाटी घ्यायचे. तसेच ज्वारी पीठही अर्धी वाटी घ्यायचे. बाजरीचे पिठही अर्धी वाटी घ्यायचे. ओट्सही अर्धी वाटी घ्यायचे. तेवढेच बदाम घ्यायचे. काजू फार उष्ण असतात. त्यामुळे पचायलाही कठीण जातात. म्हणून काजू जरा कमी घ्यायचे. सुकं खोबरं चार चमचे पुरेसे होते. पाच ते सहा खजूर घ्यायचे. चार - पाच खारीक घ्यायच्या.
२. एका पॅन मध्ये किंवा कढईत पदार्थ भाजायचे. आधी नाचणी परतून घ्या. नाचणी झाल्यावर ज्वारी आणि बाजरी एकत्र भाजले तरी चालेल. नाचणी जरा जास्त भाजायची. ओट्सही अगदी हलके भाजायचे. काजू आणि बदाम मस्त खमंग भाजायचे. सुकं खोबरंही जरा भाजून घ्यायचे. खारीक घ्या आणि त्यातील बिया काढून टाका. अक्रोडही हलकेसे भाजायचे. सगळे पदार्थ भाजल्यावर गार करत ठेवायचे.
३. एका मिक्सरच्या भांड्यात सगळे पदार्थ घ्यायचे. त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. तसेच चमचाभर जायफळ पूड घालायची. सगळे पदार्थ मस्त वाटून घ्यायचे. त्याची छान सरसरीत पूड तयार करायची. हवाबंद डब्यात ठेवायची. खाताना वाटीभर दुधात ही पूड भिजवायची. छान मुरली की मिक्स करुन खायची. चवीला छान लागतेच शिवाय फारच पौष्टिक असते. लहान मुलांसोबत मोठ्यांसाठीही मस्त नाश्ता आहे.
गरम दुधात २ चमचे ही पूड घालून ढवळा. हवे असल्यास मध किंवा गूळ घालू शकता. ही पावडर मुलांच्या हाडांसाठी, स्नायूंसाठी, पचनासाठी खूप चांगली आहे. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, लोह, फायबर आणि शरीरासाठी चांगले असणारे फॅट्स असतात. त्यामुळे ही पूड नक्की खाऊन पाहा.