कॅल्शियम आणि प्रोटीनने समृद्ध असलेलं पनीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पनीरपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. जेव्हा घरी पाहुणे येणार असतात तेव्हा लोक पनीरपासून हमखास काहीतरी खास रेसिपी बनवतात. काही लोकांना पनीर खायला प्रचंड आवडतं.
पनीर फक्त खायला चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही चांगलं आहे. पनीरमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त पनीर खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त पनीर खाल्ल्याने लोक आजारी पडू शकतात.
फूड पॉयझनिंग
पनीरमध्ये प्रोटीन जास्त असतात. यामुळे जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्लं आणि निकृष्ट दर्जाच्या पनीरचं सेवन केलं तर फूड पॉयझनिंग होण्याची समस्या उद्भवू शकते. सध्या बाजारात बनावट पनीर देखील मिळत आहे.
ऍलर्जी
जर तुम्हाला लॅक्टोज इनटॉलेरेंस असेल तर पनीर खाताना सावध राहा. कारण अशा लोकांना पनीर खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. पनीरमध्ये लॅक्टोजचं प्रमाण कमी असलं तरी खबरदारी म्हणून ते कमी प्रमाणात खाणं चांगलं आहे.
पचनाचा त्रास
जास्त पनीर खाल्ल्याने प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि पनीरमुळे अतिसार होऊ शकतो. पचनासंबंधीत त्रास होतो. पोटफुगीसह गॅसची समस्या उद्भवू शकते.
हृदयासंबंधित आजार
जर तुम्हाला हृदयासंबंधित आजार असेल तर तुम्ही जास्त पनीर खाणं टाळावं कारण पनीरमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. जास्त पनीर खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
हाय ब्लड प्रेशर
हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी जास्त पनीर खाऊ नये. पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते जास्त खाल्लाने हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो.