नैवेद्यासाठी काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक सणापूर्वी पडतोच. भारतात अनेक गोडाचे पदार्थ आहेत जे करायला सोपे आणि चवीला मस्त आहेत. (Guru Purnima 2025: Traditional food, Make instant Sakhatbhat for Naivedya, an authentic Marathi dish with traditional taste)गुरुपौर्णिमेसाठी झटपट आणि मोकळा असा साखरभात नक्की करुन पाहा. करायला अगदी सोपा आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल.
साहित्य
बासमती तांदूळ (साधाही चालेल), तूप, सुकामेवा, वेलची, साखर, केशर(नसले तरी चालेल), लवंग, पाणी, वेलची पूड, नारळ
कृती
१. छान ताजा नारळ घ्यायचा. फोडायचा आणि व्यवस्थित खवायचा. मग बासमती तांदूळ घ्यायचा आणि स्वच्छ धुवायचा. साधा तांदूळ घेतला तरी कृती सारखीच आहे. मात्र बासमती जास्त मोकळा होतो आणि चवीलाही छान लागतो. तांदूळ धुतल्यावर जरा निथळायचे. केशर कोमट पाण्यात भिजवायचे.
२. एका कुकरमध्ये किंवा खोलगट भांड्यात थोडे तूप घ्यायचे. त्यावर वेलची आणि लवंग परतायची. अगदी दोन ते तीन लवंग आणि एखाद-दुसरी वेलची घ्यायची. छान परतायची. परतून झाल्यावर त्यात सुकामेवा घालायचा आणि खमंग परतायचा. काजू घ्यायचे. तसेच बदाम आणि बेदाणे घ्यायचे. इतर आवडीचे पदार्थ घ्यायचे. सुकामेवा मंद आचेवर परतायचा. छान खमंग परतून झाल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालायचे. तांदूळ पाच मिनिटे परतायचे. मग त्यात नारळ घालायचा आणि नारळही खमंग परतायचा. पाणी नसल्यामुळे तांदूळ खाली चिकटले तरी हरकत नाही नंतर ते सुटतात.
३. नारळाचा खमंग वास आल्यावर त्यात पाणी घालायचे. जरा त्यात उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर त्यात केशराचे पाणी घालायचे आणि चमचाभर तूपही घालायचे. त्यात साखर घालायची. वाटीभर तांदूळ असतील तर वाटीभर साखरही घाला. कमी गोड आवडत असेल तर अर्धी वाटी घालायची. पाणी जास्त नाही घालयचे. भात मोकळा करायचा आहे. कुकरला लावण्यापेक्षा भांड्यात करा जास्त मोकळा होतो.
४. एका शिटीत भात होईल. कारण तो आधीच उकळून आणि परतून घेतलेला आहे. मग गॅस बंद करायचा. कुकर उघडला की गरमागरम भात ताटात घ्यायचा. त्यावर तूप घालायचे आणि मस्त गरमागरम भाताचा आस्वाद घ्यायचा.