Join us

Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:40 IST

Gulabjamun Recipe: गुलाबजाम सगळ्यांनाच आवडतात, सणासुदीला कमी साहित्यात आणि कमी वेळेत करता आले तर आणखी काय हवं?

भारतीय सण उत्सव गोड पदार्थांशिवाय अपूर्ण मानले जातात. नव्हे तर साजरे झाले नाहीत असेच वाटते. पूर्वी सण वार हे गोड खाण्यासाठी निमित्त असे. आता तसे नाही, वाढदिवस, पाहुणे राहूणे, किटी पार्टी, भिषी, प्रमोशन अशा कोणत्याही सोहळ्याच्या निमित्ताने किंवा अगदी चवबदल म्हणूनही गोड पदार्थ केले जातात. सध्या श्रावण(Shravan 2025) सुरू आहे आणि आता तर गोकुळाष्टमी(Janmashtami 2025), दही हंडी(Dahi Handi 2025) असे अनेक सण येणार आहेत. त्या मुहूर्तावर झटपट होणारा, सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. घरच्या साहित्यात १५ मिनिटांत तो कसा करता येईल याची डिटेल रेसेपी जाणून घेऊया क्रांती इंगळे यांच्याकडून!

गुलाबजाम सर्वांनाच खायला आवडतात. पण गुलाबजामचा पाक करण्यापासून ते गोळे तळेपर्यंत अनेक स्टेप्स लक्षपूर्वक कराव्या लागतात अन्यथा पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. मावा न वापरता रव्याचे सॉफ्ट गुलाबजाम करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

1) रव्याचे गुलाब जाम करण्यासाठी सगळ्यात आधी पाक तयार करून घ्या.  ४ कप साखर घेऊन त्यात ३ कप पाणी घालून साखरेचा पाक तयार करून घ्या. पाण्याला उकळ आल्यानंतर चमच्याने हलवत राहा. जेणेकरून पूर्ण साखर व्यवस्थित विरघळेल. यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. जेणेकरून साखरेच्या पाकात  खडे तयार होणार नाहीत.

2)  त्यात वेलची पावडर घाला. सुगंधासाठी  त्यात केसर घाला. एकदम पातळ पाक तयार करा. या पाकात अर्धा कप गुलाबपाणी घाला.  यामुळे गुलाबजामला चांगली चव येईल. 3) १ कप रवा मिक्सरमधून बारीक करून घ्या. जर तुम्ही रवा व्यवस्थित बारीक करून घेतला नाही तर गुलाबजामून सॉफ्ट न होता दाणेदार होतील. 

4) नंतर अर्धा लिटर दूधात ३ टेबलस्पून साजूक तूप घाला. जेणेकरून गुलाबजामूनला चांगले टेक्चर येईल. दूधात हळूहळू रव्याचे बारीक केलेल मिश्रण घाला. यात अर्धा कप मैदा घाला. फ्लेवरसाठी तुम्ही या मिश्रणात गुलाबपाणी मिसळा. नंतर गॅस ऑन करून हे मिश्रण ढवळत ढवळून शिजवून घ्या. 

5) रवा -मैदा व्यवस्थित फुलेपर्यंत ढवळून घ्या नंतर गॅस बंद करा.  रवा-मैद्याचा गोळा  घट्ट झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. हा गोळा गरम असतानाच तुपाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करा. 

6) गरम तेलात गुलाब जाम  तळून घ्या. गुलाबजाम तळताना मंच आच ठेवा. जास्त आचेवर गुलाबजामून फुटू शकतात. सगळे गुलाबजाम एकत्र न घालता  हळूहळू घाला.

7) चमच्याने गुलाबजामवर गरम तेल घालू शकता. गरम गरम गुलाबजाम एका ताटात काढून घ्या. पाक पूर्ण थंड झाल्यानंतर  त्यात गुलाबजाम घाला. गुलाबजाम  खाल्ल्यानंतर तुम्हाला रव्याची टेस्ट अजिबात येणार नाही. माव्याच्या गुलाबजाम प्रमाणे मऊ लागतील. 

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशल पदार्थ