ढोकळा हा कित्येक लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. गरमागरम सुपरस्पाँजी ढोकळा आणि त्याच्यासोबत चिंच पुदिन्याची आंबट, गोड, तिखट चटणी म्हणजे खूप जणांना अगदी आवडीचा नाश्ता. नाश्त्याला, संध्याकाळी चहासोबत किंवा अचानक पाहुणे घरी आल्यानंतर काहीतरी झटपट करायचं असेल तर ढोकळा हा एक अतिशय मस्त पदार्थ आहे. पण काहीजणींना ढोकळा करणं खूप अवघड वाटतं. त्यांनी केलेला ढोकळा व्यवस्थित फुगत नाही, कच्चा राहातो. म्हणूनच आता चवदार ढोकळा करण्याची ही अस्सल गुजराती रेसिपी पाहा (how to make soft and spongy khaman dhokla?). या रेसिपीने केलेला ढोकळा अगदी मस्त फुगेल आणि विशेष म्हणजे कापसासारखा मऊसूत होईल.(Gujarat Special Khaman Dhokla Recipe)
गुजरात स्पेशल खमण ढोकळा करण्याची रेसिपी
साहित्य
२ कप बेसन
१ टीस्पून हळद आणि १ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ आणि चमचाभर तेल
२ हिरव्या मिरच्या आणि १ इंच आल्याचा तुकडा
२ टेबलस्पून लिंबाचा रस आणि १ कप पाणी
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कडिपत्ता.
१ इनो सॅचेट
कृती
खमण ढोकळा करण्यासाठी मिक्सरचं एक भांडं घ्या. त्यामध्ये बेसन, हिरव्या मिरच्या, आलं, तेल, मीठ, साखर, हळद, लिंबाचा रस असं सगळं घाला आणि सगळे पदार्थ मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्या.
यानंतर तयार झालेलं मिश्रण एका भांड्यात काढा आणि ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून ठेवा. तोपर्यंत कुकर गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात पाणी घालून एक वाटी ठेवा. कुकरची शिट्टी आणि झाकणाचं रिंग काढून टाका. यानंतर कुकरचा डबा घ्या. त्याला सगळीकडून तेल लावा. तयार केलेल्या ढोकळ्याच्या पिठात इनो घालून हलवून घ्या आणि हे पीठ आता कुकरच्या डब्यात ओता. हा डबा अलगदपणे गरम झालेल्या कुकरमध्ये १५ मिनिटांसाठी मंद ते मध्यम आचेवर ठेवून द्या. मस्त टम्म फुगलेला गुजराती स्टाईलचा गरमागरम खमण ढोकळा तयार.
