गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण (Gudhi Padva 2026). पहिल्या सणाचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच असतो. आता गुढीपाडवा म्हटलं की काही ठिकाणी वर्षाचा पहिला सण म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, तर बहुसंख्य ठिकाणी श्रीखंड पुरीचा बेत असतो.. आता काही जणींना श्रीखंड तयार करणं हे खूपच कठीण आणि वेळखाऊ काम वाटतं. तुमचंही असंच असेल तर अगदी १० ते १५ मिनिटांत श्रीखंड कसं तयार करायचं याची ही रेसिपी एकदा बघाच (Gudhi Padva special shrikhand recipe).. रेसिपी अतिशय सोपी असून घरीच अतिशय उत्कृष्ट चवीचं केशर, बदाम श्रीखंड कसं करायचं ते पाहूया..(easy and simple recipe of making shrikhand)
केशर- बदाम श्रीखंड करण्याची रेसिपी
साहित्य
३ वाट्या दही
एक वाटी पिठी साखर
केशराच्या ८ ते १० काड्या आणि १ टीस्पून वेलची पूड
८ ते १० बदामाचे काप
कृती
केशर बदाम फ्लेवरचं श्रीखंड करण्यासाठी सगळ्यात आधी केशर एका कागदात घ्या आणि हा कागद गरम तव्यावर अगदी अर्धा मिनिट ठेवा. त्यानंतर त्यातलं केशर काढून ते एका वाटीत घाला आणि त्यात अगदी चमचाभर पाणी घाला.
यानंतर दही एका सुती कपड्यात घट्ट गुंडाळून घ्या आणि अगदी पिळून पिळून त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. हाताने भरपूर दाब देऊन पाणी काढून टाकलं तर अगदी ५ ते ७ मिनिटांत दह्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि छान घट्ट चक्का दही तयार होतं.
आता घट्ट चक्का दही एका भांड्यात घ्या. हे दही जेवढं असेल त्याच्या थोडी कमी याप्रमाणात साखर घाला. म्हणजेच जर घट्ट दही १ वाटी असेल तर त्यात पाऊण वाटी साखर घालावी. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं. तसेच श्रीखंड करण्यासाठी नेहमी पिठी साखरच वापरावी. आता बदामाचे काप, वेलचीपूड आणि भिजत घातलेल्या केशराचं पाणी दह्यामध्ये घालून सगळे पदार्थ छान फेटून एकजीव करून घ्यावे. कोणताही विकतचा रंग न घालता अतिशय छान हलका केशरी रंग तुमच्या श्रीखंडाला आलेला असेल. शिवाय या श्रीखंडाची चव विकत मिळणाऱ्या श्रीखंडापेक्षा तर कित्येक पटींनी जास्त छान असेल. या गुढीपाडव्याला श्रीखंड करण्याची ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.
