हिवाळा सुरु होताच वातावरणात एक सुखद गारवा निर्माण होतो, पण त्याचबरोबर थंडीमुळे शरीराची ऊर्जा देखील कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज अधिक भासते. अशावेळी, काही खास खाद्यपदार्थच ऊर्जेचा उत्तम स्रोत बनतात...पारंपरिक भारतीय आहारात थंडीचा सामना करण्यासाठी अनेक उत्कृष्ट आणि खास ऊब देणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. हे पदार्थ फक्त जिभेला चव देत नाहीत, तर शरीराला आतून ऊब देतात आणि थंडीमुळे होणाऱ्या लहान - सहान समस्यांपासून बचाव करतात. हिवाळ्यात आरोग्याला आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू हा एक उत्तम पर्याय ठरतो(Green Moong Laddu Recipe).
हिरवा मूग प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. हे लाडू फक्त चवीला अप्रतिम नसतात, तर शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पोषण देखील देतात. गोड खाण्याची इच्छा असताना, बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले हे पौष्टिक लाडू एक उत्कृष्ट पर्याय आहेत. थंडीच्या दिवसांत पचन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी हे लाडू उत्तम मानले जातात. अगदी कमी साहित्य वापरून आणि थोड्याच वेळात तयार होणारी ही पारंपारिक रेसिपी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती. हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरवे मूग - १ कप
२. गूळ - ३/ ४ कप
३. साजूक तूप - १/२ कप
४. वेलची पावडर - १ ते २ टेबलस्पून
५. बदाम - काजू - २ ते ३ टेबलस्पून (चिरून घेतलेले)
६. सुक खोबर - ४ ते ५ टेबलस्पून
७. जायफळ पूड - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वात आधी मूग कोरडेच भाजून घ्या. पॅनमध्ये हिरवे मुग मध्यम आचेवर कोरडे भाजा. ते थोडे फुटायला लागले आणि हलका सुगंध आला की गॅस बंद करा. पूर्ण थंड होऊ द्या.
२. थंड झाल्यावर मूग थोडे जाडसर किंवा बारीक आवडीप्रमाणे वाटून घ्या. हलक्या चवीसाठी बारीक, आणि नटी टेक्स्चरसाठी जाडसर वाटू शकता.
३. मग कढईत थोडे तूप घेऊन त्यात वाटलेले पीठ खमंग सुगंध येईपर्यंत हलकेच २ ते ३ मिनिटे भाजून घ्यावे. भाजून घेतलेले पीठ एका डिशमध्ये काढून बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
४. परत कढईत साजूक तूप घेऊन त्यात काजू - बदामाचे तुकडे किंवा ड्रायफ्रुटसचे तुकडे हलकेच परतवून घ्यावेत. हे ड्रायफ्रुटस बाजूला एका डिशमध्ये काढून घ्यावे.
५. सुकं खोबरं किसून ते देखील कोरडं भाजून घ्यावे.
६. कढईत साजूक तूप घेऊन त्यात किसलेला गूळ घालून तो वितळवून त्याचा पाक तयार करून घ्यावा.
७. एका मोठ्या परातीमध्ये भाजून घेतलेलं हिरव्या मुगाचं पीठ, खरपूस तळून घेतलेले ड्रायफ्रुटस, भाजून घेतलेलं सुकं खोबरं, गुळाचा पाक, वेलचीप- जायफळ पूड असे सगळे जिन्नस एकत्रित करून हाताने हलकेच दाब देत कालवून घ्यावेत. जर मिश्रण सैल वाटत असेल तर अजून थोडे गरम तूप घालू शकता.
८. लाडूचे मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळा.
हिरव्या मुगाचे पौष्टिक असे हिवाळ्यात शरीराला आरोग्यदायी असणारे लाडू खाण्यासाठी तयार आहे.
