Join us

हॉटेलात मिळते तशी परफेक्ट हिरवी चटणी करण्यासाठी हव्या फक्त दोन गोष्टी- सँडविच चटणीची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2023 15:39 IST

Green Chutney Recipe : थोडीशी तिखट, थोडी आंबट-गोड अशी ही चटणी खाल्ली की नकळत तोंडाला चव येते.

सँडविच असो किंवा इडली-डोसा आपल्याला त्याच्यासोबत ग्रीन चटणी लागतेच. अगदी चाटसाठी, धिरड्यासोबत किंवा पोळीला लावून खाण्यासाठीही आपण ही ग्रीन चटणी वापरतो. या चटणीचा हिरवागार रंगच अतिशय मोहक असतो. ही चटणी कधी फार पातळ होते तर कधी एकदम घट्टसर आणि बेचव होते. पण ती परफेक्ट चविष्ट होण्यासाठी काय करायचं याच्या सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. या चटणीला मस्त चव असेल तर आपल्या पदार्थालाही नकळत छान स्वाद येतो. नेहमीचीच अगदी सोपी वाटणाऱ्या या रेसिपीत छोटेसे बदल केल्यास या चटणीची चव आणि स्वाद फारच छान होतो. थोडीशी तिखट, थोडी आंबट-गोड अशी ही चटणी खाल्ली की नकळत तोंडाला चव येते. पाहूयात यासाठी नेमकं काय करायचं (Green Chutney Recipe). 

साहित्य -

१. कोथिंबीर - २ वाट्या

२. मिरच्या - ५ ते ७ 

३. कडीपत्ता - ५ ते ७ पाने

(Image : Google)

४. लसूण - ४ ते ५ पाकळ्या

५. आलं - १ इंच

६. जीरं - अर्धा चमचा 

७. सैंधव - अर्धा चमचा

८. लिंबाचा रस - १ चमचा 

९. मीठ - चवीनुसार 

१०. बर्फाचे खडे - २ ते ३

११. पाणी- आवश्यकतेनुसार

१२. बारीक शेव - २ ते ३ चमचे 

कृती -

१. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. 

२. त्यामध्ये आल्याचे तुकडे, कडीपत्ता, लसूण आणि मिरच्या घालायचे. 

३. जीरं, शेव, लिंबाचा रस, दोन्ही प्रकारचे मीठ घालून थोडे पाणी घालायचे.

४. सगळ्यात शेवटी बर्फाचे क्यूब टाकायचे, यामुळे चटणीचा रंग हिरवागार राहण्यास मदत होते. 

५. हे सगळे मिक्सरमध्ये चांगले बारीक करुन घ्यायचे आणि एका बाऊलमध्ये काढायचे. 

६. शेव नसेल तर त्याऐवजी १ ब्रेड स्लाइस घेतला तरी चालतो.

७. ही चटणी फ्रिजमध्ये २ ते ३ दिवस चांगली टिकते. 

८. आवडीप्रमाणे अर्धा चमचा साखर घातली तरी चालते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.