पित्ताचा त्रास हा अनेकांना सातत्याने होतो. आठवड्याचे दोन दिवस डोकेदुखी आणि दोन दिवस उलट्या करण्यात जातात. काहीही खाल्ले तरी पित्त उफाळते. तसेच प्रवास, जागरणं त्यांना अजिबात झेपत नाहीत. आम्लपित्त, छातीत जळजळ, उलटी, मळमळ, तोंड कडवट होणे किंवा डोकेदुखी ही त्याची लक्षणे पित्ताचा भरपूर प्रमाणात त्रास ज्यांना होतो त्यांच्यात आढळतात. आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या लोकांना मसालेदार, तेलकट, आंबट आणि उष्ण पदार्थ पचविणे अवघड जाते. त्यामुळे योग्य आहार व घरगुती उपाय यांना फार महत्त्व आहे. अनेक घरगुती उपाय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे आलं-मीठ हे मिश्रण. आलं हे भूक वाढवणारे, पचनाला मदत करणारे आणि मळमळ थांबवणारे असल्याने ते उपयुक्त मानले जाते. मीठासोबत घेतल्यास अन्नपचन सुधारते आणि पोट हलके राहते.
आलं हे जठराग्नी प्रज्वलित करणारे मानले जाते. म्हणजेच भूक न लागणे, अपचन होणे किंवा पोट जड होणे अशा तक्रारींमध्ये आलं मदत करते. मीठासोबत घेतल्यास पचनसंस्थेवर त्याचा परिणाम अधिक सौम्य व प्रभावी होतो. मीठ अन्ननलिकेत रस तयार करायला मदत करते, त्यामुळे जेवण सहज पचते. हे मिश्रण खाल्ल्याने भूक वाढते, अन्न चांगले पचते आणि पोटाची काही कुरकुर असेल तर ती बंद होते.
मळमळ, उलटीची भावना आणि प्रवासात होणारा मोशन सिकनेस यात आलं-मीठ उपयोगी ठरते. थोडेसे चावून खाल्ल्यास पोटाला शांतता मिळते आणि उलटी होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय गॅसेसची समस्या कमी होण्यास मदत होते. ब्लोटींगही कमी होते.
हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात शरीर थंड झाल्यास आलं-मीठ थोड्या प्रमाणात घेतल्याने उष्णता मिळते आणि सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी होते. आलं रक्ताभिसरण सुधारते, घसा उबदार ठेवते आणि कफ सैल करण्यास मदत करते. मीठ घशासाठी फार चांगले असते. त्यामुळे खवखव कमी होते. आलं किसून त्यात चमचाभर मीठ घालून अगदी थोडे-थोडे दिवसातून दोनदा खा. होणारे पचनाचे त्रास नक्की कमी होतात.