भरपूर चीज घालून तयार केलेला गार्लिक ब्रेड हा लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ. लहान मुलंच काय पण मोठी माणसंही अगदी आवडीने गार्लिक ब्रेड खातात. वाढत्या वजनाकडे कधी कधी डोळेझाक करत भरपूर चीज मारलेला गार्लिक ब्रेड मागवला जातो आणि त्यावर अगदी मनापासून ताव मारला जातो. हा ब्रेड हॉटेलमध्ये खूप महाग मिळतो. पण तुम्ही घरच्याघरी तो अगदी कमीतकमी पैशांत, कमीतकमी वेळेत करू शकता (how to make cheese garlic bread?) आणि शिवाय पोटभर खाऊ शकता. त्याचीच ही एक सोपी रेसिपी पाहा..(garlic bread recipe in just 10 minutes)
चीज गार्लिक ब्रेड रेसिपी
साहित्य
१ ते २ टेबलस्पून तेल
अर्धी वाटी लसूण पाकळ्या
३ चमचे बटर
२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ ते ३ टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो
अर्धे कापलेले पाव. पाव एकेक कापू नये. अख्खी लादीच त्यासाठी घ्यावी.
अर्धी वाटी मोझेरेला चीज
कृती
सगळ्यात आधी एक छोटी कढई घ्या. त्या कढईमध्ये तेल घाला आणि त्यात लसूण पाकळ्या तळून घ्या. मंद आचेवर लसूण तळावा नाहीतर तो जळतो आणि त्याला उग्र वास येतो. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत लसूण पाकळ्या तळून घेतल्या की त्या कढईच्या बाहेर काढून घ्या आणि थंड होऊ द्या.
यानंतर थंड झालेल्या लसूण पाकळ्या बारीक ठेचून घ्या. त्यात बटर, चिलीफ्लेक्स, ओरिगॅनो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घाला आणि सगळे पदार्थ एकजीव करून घ्या.
यानंतर पावची लादी मधोमध कापा. त्यावर आपण तयार केलेलं मिश्रण लावा. त्यावर मोजेरेला चीज टाका. तव्याला खालच्या बाजुने बटर लावा. त्यावर चीज लावलेला पाव ठेवा आणि मग त्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या. यानंतर ते तव्यावरून काढून घ्या आणि त्याचे काप करा. मस्त गरमागरम अतिशय चिझी असा गार्लिक ब्रेड तयार.
