आता घराघरातून छान मोदकांचा सुगंध दरवळेल. गणपती आधी प्रॅक्टीस म्हणूनही अनेक जण मोदक करुन पाहतात. गणपतीत तर केले जातातच. एकदा घरच्यांसाठी एकदा मित्रपरिवारासाठी कधीतरी मज्जा म्हणूनही केले जातात. मोदक करुन झाल्यावर उरलेल्या सारणाचे विविध प्रकार करता येतात. ते सारण तूप घालून नुसते खाल्ले तरी एकदम चविष्ट लागते. (Ganeshotsav Special: Traditional Nivgari must be eaten with Modaks, see authentic traditional recipes from Konkan)मात्र तांदळाच्या उकडीचे काय करायचे असा प्रश्न पडतो का ? तांदळाच्या उकडीचा मस्त पारंपरिक पदार्थ करता येतो. ज्याला निवगऱ्या असे म्हटले जाते. अगदी सोपी रेसिपी आहे. कोकणात हा पदार्थ करण्यासाठी खास तांदळाची उकड बाजूला काढून ठेवली जाते. पाहा निवगऱ्या करायची पद्धत.
साहित्य
तांदळाची उकड, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, तेल, जिरे पूड
कृती
१. तांदळाची उकड थोडं तेल लावून जरा सैलसर करुन घ्यायची. हिरवी मिरची मिकसरमधून वाटून घ्यायची. हिरव्या मिरचीची पेस्ट करायची. या रेसिपीमध्ये लसूण आलं काहीही घातलं जात नाही. अगदी साधी रेसिपी आहे मात्र चव एकदम मस्त.
२. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. छान निवडून घ्यायची. कोथिंबीर धुवायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची. तांदळाच्या उकडमध्ये कोथिंबीर घालायची. तसेच चमचाभर जिरे पूड घालायची. त्यात साधे जिरेही घालायचे आणि हिरव्या मिरचीचे वाटण घालायचे. मीठ घालायचे. सगळे छान एकजीव करुन घ्यायचे.
३. सैलसर पीठ मळून झाल्यावर हाताला तेल लावायचे आणि त्याचे गोल हाताने तयार करायचे. लाट्या ज्या पद्धतीने तयार करता तसेच फक्त जरा जाडसर करायचे. सगळ्या तयार करुन एका ताटात सगळे मांडा नंतर जसे मोदक उकडून घेता तसेच वाफवून घ्यायचे. वीस मिनिटे वाफवा निवगऱ्या तयार होतात. दह्याशी खा किंवा मिरचीचा ठेचा सोबत घ्या. अगदी छान लागतात.
४. काही जण निवगऱ्या ताकातही भिजवतात. तशाही छान लागतात. फक्त जास्त टिकत नाहीत. त्यामुळे लगेच फस्त करायच्या. एकदम साधी आणि छान रेसिपी नक्की करुन पाहा.