Join us
Daily Top 2Weekly Top 5

Food Swaps For Summer : उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढणार नाही, जाणून घ्या - कशाऐवजी काय खावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 14:52 IST

Food Swaps For Summer: try healthy alternatives in summers, good for body : उन्हाळ्यात काय खावे आणि काय नाही जाणून घ्या.

उन्हाळ्यात सतत थकवा येणे, चिडचिड होणे, डोके जड वाटणे किंवा शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटणे हे खूप सामान्य झाले आहे. अनेकांना वाटतं की आपण भरपूर पाणी पितो म्हणजे शरीर व्यवस्थित हायड्रेटेड आहे, पण फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं. आपण रोज जे खातो त्याचाही शरीरावर मोठा परिणाम होत असतो. काही पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात, पचनावर ताण आणतात आणि त्यामुळे उन्हाचा त्रास अधिक जाणवू लागतो. म्हणूनच उन्हाळ्यात आहारात छोटे बदल करणे खूप गरजेचे ठरते.

उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबूपाणी किंवा नारळपाणी पिणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. कारण सॉफ्ट ड्रिंक्स काही वेळ ताजेतवाने वाटले तरी शरीराला योग्य hydration देत नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक पेयं शरीराला थंड ठेवतात. त्याचप्रमाणे गरमागरम चहा किंवा जास्त कॉफी पिण्याऐवजी ताक, कोकम सरबत किंवा बेलाचं सरबत घेतलं तर शरीराला आराम मिळतो.

अनेकांना उन्हाळ्यातही तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण अशा पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे मसालेदार किंवा जड जेवणाऐवजी साधा डाळ-भात, वरण-भात किंवा हलकं घरगुती जेवण खाणं अधिक चांगलं मानलं जातं. मैद्याचे पदार्थ, बर्गर, पिझ्झा किंवा जंक फूड खाल्ल्यानंतर शरीर अधिक सुस्त होतं. त्याऐवजी पोहे, उपमा, इडली किंवा ज्वारीची भाकरी असे हलके पदार्थ पचायलाही सोपे असतात आणि शरीरावर ताणही येत नाही.

उन्हाळ्यात तळलेले चिप्स, नमकीन किंवा पॅकेज्ड स्नॅक्स खाण्यापेक्षा काकडी, टरबूज, खरबूज, पपई यांसारखी पाण्याने भरपूर असलेली फळं खाणं अधिक योग्य ठरतं. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. आइस्क्रीम खाल्ल्याने काही वेळ गार वाटतं, पण जास्त साखर आणि फॅट्समुळे शरीराला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी घरगुती फळांचे शेक किंवा दही खाल्ल्यास शरीराला थंडावा आणि पोषण दोन्ही मिळतं.

मूग, कडधान्यं किंवा हलके प्रोटीनयुक्त पदार्थ उन्हाळ्यात अधिक खावे. त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंक्स पिण्यापेक्षा सत्तूचं पेय किंवा लिंबू सरबत घेतलं तर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात स्वतःला फ्रेश आणि निरोगी ठेवण्यासाठी मोठे डाएट प्लॅन करण्याची गरज नसते. फक्त रोजच्या आहारातील काही पदार्थ बदलले तरी शरीर हलकं राहतं, पचन सुधारतं आणि उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. छोटे बदलही उन्हाळ्यात मोठा फरक घडवू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Smart Food Swaps for a Cool Summer

Web Summary : Stay refreshed this summer by swapping heavy foods and sugary drinks for lighter, hydrating options. Choose fruits, traditional coolants like buttermilk, and easily digestible grains to combat heat and fatigue.
टॅग्स :उन्हाळाअन्नहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल