Join us

शिळ्या पोळ्यांचे करा भन्नाट 'रोटी पकोडे'! रात्री पोळ्या उरल्या तरी नो टेंशन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 17:24 IST

Roti pakode रात्री, सकाळी, दुपारी अशा कोणत्याही वेळेत करण्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे.. अन्नही वाया जात नाही आणि छान चवदार पदार्थही तयार होतो....

ठळक मुद्देपोळ्याही वाया जात नाहीत आणि चवीतही बदल होतो. त्यामुळे पोळ्या उरल्या की ही सोपी रेसिपी नक्कीच करून बघा.

Spicy Pakode असं बऱ्याचदा होतं की सकाळच्या थोड्या पोळ्या रात्री उरलेल्या असतात. मग दुसरी भाजी करून भाजी- पोळी खाण्याची मुळीच इच्छा नसते. कारण तेच ते भाजी- पोळी खाऊन आपल्याला जाम कंटाळा आलेला असतो. अशा वेळी उरलेल्या दोन- तीन पोळ्यांचंच करायचं काय, असा प्रश्न पडला असेल, तर हा रोटी पकोडा ट्राय करा... अशी भारी चवदार रेसिपी होईल, की पोळ्याही संपतील आणि काही वेगळं, नविन खाल्ल्याचा आनंदही घरच्या मंडळींना मिळेल.

 

ही रेसिपी तुम्ही वन डिश मिल म्हणून रात्री केली तरी चालते. किंवा रात्री केलेल्या पोळ्या उरल्या असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट म्हणून देखील रोटी पकोडे खाऊ शकता. कारण बऱ्याचदा शिळ्या पोळ्या उरल्या की त्याचा कुस्करा केला जातो आणि मग कुस्करा खाऊन- खाऊन घरातली मंडळी पार वैतागून जातात. किंवा संध्याकाळी ५- ६ वाजता थोडीशी भूक लागली असेल तर चहासोबतही रोटी पकोडे खायला अतिशय टेस्टी लागतात. थोडक्यात सांगायचं तर ही रेसिपी एव्हरग्रीन असून तुम्ही कधीही खाऊ शकता. शिवाय करायलाही खूपच सोपी आहे. पोळ्याही वाया जात नाहीत आणि चवीतही बदल होतो. त्यामुळे पोळ्या उरल्या की ही सोपी रेसिपी नक्कीच करून बघा.

 

रोटी पकोडा करण्यासाठी लागणारे साहित्यउरलेल्या पोळ्या, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या, अद्रक लसून पेस्ट, बेसन, हळद, कोथिंबीर, तेल, चवीनुसार तिखट आणि  मीठ, जीरेपूड, धनेपूड, कांदा.

अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

कसा करायचा रोटी पकोडा..- रोटी पकोडा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या.- उकडलेला बटाटा स्मॅश करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- आता एका शिळ्या पोळीवर आपण तयार केलेले बटाट्याचे मिश्रण सर्वभागात समान प्रमाणात पसरवा.- त्या पोळीवर दुसरी पोळी ठेवा. पोळी व्यवस्थित दाबून घ्या. जेणेकरून दोन पोळ्यांना मधले बटाट्याचे सारण व्यवस्थित घट्ट धरून ठेवेल.

- आता या पोळीचे मधोमध दोन काप करा. दोन्ही कापांना आणखी मधोमध कापा. थोडक्यात या पोळीचे चतकोर पोळीसारखे तुकडे करा. - आता बेसन पीठ एका बाऊलमध्ये घ्या. त्यात थोडे तिखट, चवीनुसार तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, जीरेपूड असं सगळं टाका. - आता आपण केलेले पोळीचे तुकडे या बेसन पीठात घोळा आणि कढईमध्ये तेल टाकून त्यात तळून घ्या.  - स्वादिष्ट आणि चटपटीत रोटी पकोडा झाला तयार.- टोमॅटो सॉससोबत खाण्यास हे पकोडे अतिशय मस्त लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.