Join us

फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे, पराठे! वेटलॉस, शुगर कन्ट्रोलसाठी उत्तम पर्याय, चव जबरदस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 15:49 IST

तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनविलेली इडली आणि डोसे आपण नेहमीच खातो. आता थाेडा बदल करा. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आणि अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे आणि पराठे. करुन तर बघा!

ठळक मुद्देशुगर कंट्रोल आणि वेटलॉस यासाठी हा आहार अतिशय उत्तम असल्याचे नुकतेच अमेरिकन डायबेटिज असोसिएशन यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना खाण्यापिण्याचे भरमसाठ नियम पाळावे लागतात. त्यांच्या खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळताना घरातल्या स्त्रियांची खूपच कसरत होते. त्यांना काय खायला द्यावे आणि काय नाही, असा संभ्रमही अनेकींना पडलेला असतो. मग इतरांसाठी वेगळा नाश्ता आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी  वेगळा नाश्ता असेही प्रकार अनेकदा होतात. म्हणूनच तर आता करून पहा कच्च्या फणसाच्या पीठापासून बनविलेल्या इडल्या, डोसे आणि पराठे. शुगर कंट्रोल आणि वेटलॉस यासाठी हा आहार अतिशय उत्तम असल्याचे नुकतेच अमेरिकन डायबेटिज असोसिएशन यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. या संस्थेच्या अभ्यासानुसार फणसामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, फायबर आणि ॲण्टी ऑक्सिडण्ट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे फणसाचे पीठ अतिशय आरोग्यदायी आहे. 

 

१. फणसाच्या पीठाची इडली आणि डोसेआपण नेहमी इडली करण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ यांचे जसे प्रमाण घेतो तसेच प्रमाण घ्यावे. म्हणजेच १ ग्लास उडीद दाळ आणि ३ ग्लास तांदूळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजू घालावेत. सहा ते सात तास डाळ- तांदूळ भिजल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून त्याचे मऊसर पीठ बनवावे. आता हे पीठ २/३ एवढे घेतले की त्यामध्ये १/३ याप्रमाणात फणसाचे पीठ टाकावे. आत नेहमी इडली- डोसे यांचे पीठ जसे आंबविण्यासाठी ठेवतो, तसेच हे मिश्रणदेखील ८ ते ९ तास भिजत ठेवावे. त्यानंतर या पीठात चवीनुसार मीठ टाकावे आणि नेहमीप्रमाणे जसे आपण डोसा व इडली करतो, त्याप्रमाणे या पीठाच्याही इडल्या आणि डोसे करावेत.

 

२. फणसाच्या पीठाचे पराठे२/३ कप गव्हाचे पीठ व १/३ कप फणसाचे पीठ घ्यावे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे आणि हे मिश्रण पाणी टाकून मळून घ्यावे. पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवावी आणि अर्धा तास भिजू द्यावी. यानंतर या पीठाचे पराठे लाटावेत आणि तव्यावर तूप टाकून मस्त खमंग भाजून घ्यावेत. दही, चटणी, लोणचे किंवा भाज्यांसोबत खायला फणसाचे पराठे चवदार लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीवेट लॉस टिप्समधुमेह