Join us

पारंपरिक मसालेभात तर दिवाळीच्या जेवाणात हवा, करा अस्सल मराठी चवीचा मसालेभात-जेवण झक्कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2024 18:56 IST

Easy recipe of masalebhat for Diwali celebration : मसालेभात मठ्ठा आणि जिलेबी हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा मेन्यू

दिवाळी म्हटली की उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. हाच आनंद द्विगुणित होण्यासाठी आपण सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्याचे ठरवतो. जेवणाच्या निमित्ताने तुम्हीही आपल्या घरी पाहुण्यांना बोलवायचा बेत एव्हाना केला असेल. पण पाहुण्यांना बोलावल्यावर जेवायला काय करायचे असा यक्षप्रश्न आपल्यासमोर असतो. झटपट होईल, सगळ्यांना आवडेल असे काहीतरी करायचे असेल तर भाताचा कोणता प्रकार करावा ते कळत नाही. पुलाव, जीरा राईस, वरण भात, दही भात यांच्याशिवाय लग्नाच्या पंगतीसारखी मसालेभात करायचा बेत करत असाल तर आज आपण त्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत (Easy recipe of masalebhat for Diwali celebration). 

आपल्याला पंगतीसारखी मसालेभात काही केल्या जमत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तांदळाचा प्रकार, मसाल्यांचे आणि पाण्याचे प्रमाण हे असते. गरमागरम मसालेभात, त्यावर खोबरं आणि कोथिंबीर, तुपाची धार, सोबतीला थोडेसे तळण आणि ताक किंवा मठ्ठा हा मेन्यू नुसता ऐकला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा मेन्यू पोटभरीचा आणि पौष्टीक तर असतोच पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने मसालेभात खातात. हा मसालेभात परफेक्ट मोकळा आणि चविष्ट व्हावा यासाठी नेमके काय करायचे ते समजून घेऊया. 

(Image : Google)

१. कढईत नेहमीप्रमाणे तेल घालून फोडणीसाठी आपण जीरे-मोहरी घालतो त्याप्रमाणे घालायचे. 

२. यानंतर याच तेलात काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडा, तमालपत्र असे मसाले घालून ते चांगले परतून घ्यायचे. 

३. यानंतर यामध्ये मटार, बटाटा, तोंडली अशा आपल्याकडे असतील त्या आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या घालून सगळे पुन्हा चांगले परतायचे.

४. या भाज्यांवर हळद, गोडा मसाला, तिखट, धणे  जीरे पावडर घालून भाज्या ५ मिनीटांसाठी झाकण ठेवून वाफ आणायला ठेवायच्या. 

५. थोडे मोठ्या आकाराचे तांदूळ स्वच्छ धुवून मग ते या भाज्यांमध्ये घालायचे आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे. 

(Image : Google)

६. पाणी घातल्यावर यामध्ये मीठ आणि अगदी थोडीशी चवीपुरती साखर घालून सगळे चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर भातावर झाकण ठेवून गॅस बारीक करायचा.

७. आवडत असल्यास यामध्ये आपण काजू घालू शकतो. सुरुवातीला खडा मसाला घालतो तेव्हाच काजू तळून घ्यायचे. 

८. भात चांगला शिजला की गॅस बंद करायचा आणि कडेने तूप सोडायचे. यामुळे भात चांगला मोकळा होण्यास मदत होते. 

९. शिजलेला भात वाढताना त्यावर बारीक कोथिंबीर, खवलेले नारळ आणि पुन्हा तूप घालायचे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळी 2024