Join us

उन्हाळ्यात प्या मनसोक्त लिंबू सरबत, ३ महिने टिकणारे लिंबू सरबत प्रिमिक्स करण्याची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 16:14 IST

Easy Recipe of Lemon Limbu Sharbat Premix : भर उन्हातून आल्यावर झटपट सरबत तयार करण्याची सोपी ट्रिक..

भर उन्हातून आलो की आपल्याला काहीतरी गारेगार प्यावेसे वाटते. उन्हाळ्याने सतत घशाला कोरड पडत असताना थंडगार काहीतरी पोटात गेलं की आपल्याला शांत वाटतं. लिंबू सरबत हा पारंपरिक प्रकार आपण नेहमीच करतो.लिंबामध्ये व्हीटॅमिन सी असते तसेच साखर आणि मीठ पोटात गेल्यावर उन्हामुळे आलेला थकवा आणि ग्लानी दूर होण्यास मदत होते. दुपारच्या कडक उन्हात हे सरबत प्यायल्यास आपल्याला नक्कीच थोडी एनर्जी आल्यासारखे वाटते. म्हणूनच आपण बाहेरुन आलो किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत कोणी पाहुणे आले की चहा-कॉफीऐवजी आवर्जून लिंबू सरबत केले जाते (Easy Recipe of Lemon Limbu Sharbat Premix). 

हे करण्यासाठी लिंबू चिरणे, बिया काढणे ते पाण्यात पिळणे, मग साखर आणि मीठ घालून हे सगळे हलवून एकजीव करणे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण हा वेळ वाचावा आणि झटपट २ मिनीटांत लिंबू सरबत तयार व्हावे यासाठी आज आपण लिंबू सरबत प्रिमिक्स कसे तयार करायचे पाहणार आहोत. कोकम, वाळा, आवळा यांसारख्या वेगवेगळ्या सरबतांचे प्रिमिक्स आपण ज्याप्रमाणे बाजारातून आणतो त्याचप्रमाणे लिंबाचे हे प्रिमिक्स घरी तयार करुन ठेवता येऊ शकते.हे प्रिमिक्स तयार करण्यासाठी कोणत्या स्टेप्स वापरायच्या पाहूया...

(Image : Google)

१. सगळ्यात आधी लिंबं अर्धी चिरून त्याचा रस काढून घ्यायचा. 

२. लिंबाचा रस वाटीने व्यवस्थित मोजून घ्यायचा. 

३. जितका रस आहे त्याच्या सहा पट साखर यामध्ये मिसळून हे मिश्रण एका थाळीत पसरून ठेवायचे. 

४. हे थाळीत पसरलेले मिश्रण पंख्याखाली साधारण २ ते ३ दिवस वाळवायचे. 

५. लिंबाचा रस साखरेत एकजीव होतो आणि साखरेत मिसळतो.

६. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करायचे. ते करताना त्यात मीठ घालायचे. 

७. एका हवाबंद डब्यात ही पूड नीट भरुन ठेवायची.

८. ऐनवेळी भर उन्हात बाहेरून आल्यावर या प्रिमिक्समध्ये पाणी घालून झटपट सरबत तयार करायचे.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.