थंडीत शरीराला आतून ऊब देणारे, सर्दी–खोकला दूर ठेवणारे आणि चविष्ट असे पेय घ्यायचे झाल्यास सुंठ–दुधाचा तिखट–गोड काढा हा उत्तम पर्याय आहे. (Drink special Sunthi milk in cold weather - you will sleep soundly, your throat will remain healthy )साध्या दुधाला सुंठ, थोडी गोडी आणि चिमूटभर तिखटपणा जोडला की तयार होणारा हा काढा शरीराला लगेच उब देतो. थंड हवेत जेव्हा हातपाय थरथरतात, घसा खवखवतो किंवा अंगात थकवा जाणवतो, तेव्हा हा काढा एकदम रामबाण उपाय ठरतो. करायला फारच सोपा आहे.
सुंठ म्हणजे सुके आले. त्याला औषधी मसाला म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सुंठ उष्ण असल्यामुळे ते शरीरातील थंडी कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि सर्दी–खोकला बरा करते तसेच कफ वितळवते. दुधामधील नैसर्गिक कॅल्शियम, प्रोटीन आणि ताकद देणारे घटक सुंठीच्या गुणांसोबत एकत्र येऊन शरीराला पोषण व उष्णता दोन्ही देतात. म्हणूनच सुंठ–दूध हे थंडीत पिण्यासाठी सर्वात उपयुक्त पेय मानले जाते. रोज झोपण्याआधी एक कप सुंठीचे दूध प्या. झोप अगदी छान लागते.
या काढ्याची चवही खास असते. किंचित तिखट, थोडे गोड आणि हलक्या मसाल्याचा सुगंध हे संयोजन चवीला मस्त वाटते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी कोवळ्या थंडीत घेतल्यास शरीरातील गारवा पटकन कमी होतो. सांधेदुखी, स्नायू दुखणे, घसा बसणे किंवा अंगदुखी यांसारख्या थंडीच्या त्रासांपासून हा काढा आराम देतो. शिवाय शरीराला नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती मिळते.
साहित्य
सुंठ, पाणी, दूध, साखर, वेलची पूड
कृती
१. पातेल्यात दूध गरम करत ठेवायचे. लहान पातेल्यात थोडे पाणी घ्यायचे. त्यात चमचाभर सुंठ घालायची.
२.त्यात वेलची पूड घालायची, उकळायचे. ते पाणी उकळत्या दुधात घालायचे. त्यात साखर घालायची. उकळायचे आणि जरा आटू द्यायचे. गरमागरम प्यायचे.
