Amla tea benefits : रोज दिवसातून तीन ते चार कप दुधाचा चहा अनेकांना लागतोच. चहा पिणं ही एक लोकांना लागलेली सवय आहे, तर दुधाचा चहा ही सुद्धा सवय असते. चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवसच चांगला जात नाही. मात्र, अनेक एक्सपर्ट वेळोवेळी सल्ला देतात की, दुधाचा चहा पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. अशात तुम्हाला आजारी पडायचं नसेल किंवा गंभीर आजाराचं शिकार व्हायचं नसेल तर तुम्ही दुधाच्या चहाऐवजी आवळ्याचा चहा पिऊ शकता. आवळ्याचे आरोग्याला एकापेक्षा एक फायदे मिळतात. इतके की, तुम्ही विचारही केला नसेल. अशात आवळ्याचा चहा पिणं तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल. त्यामुळे आवळ्याच्या चहाचे फायदे काय होतात आणि तो कसा बनवाल हे जाणून घेऊया.
आवळ्याला आयुर्वेदात एक सुपरफूड मानलं जातं. कारण यातील अनेक औषधी गुण शरीराला निरोगी ठेवतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं.
आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे
- अनेक पोषक तत्वांचा खजिना असलेला आवळ्याचा चहा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतो. आवळ्यामुळं डोळ्यांची दृष्टी मजबूत होते. सोबतच त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. इतकंच नाही तर आवळ्यातील पोषक तत्वांमुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. केसांची वाढही होते.
- आवळ्यामधील व्हिटॅमिन सी ने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्याचा चहा तुमच्या पेशींचं नुकसान होण्यापासून बचाव करतात. यानं हाडं आणि दात मजबूत होतात. सोबतच आवळा वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासही मदत करतो.
- आवळ्यामध्ये कार्ब्सचं प्रमाण अधिक असते, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. यात फायबरचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामुळं पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. आवळ्यामुळं बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
- आवळ्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे डायबिटीसचा धोका कमी करतात. तसेच आवळ्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळं कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचाही दावा केला जातो.
- आवळ्यातील अॅंटी-इफ्लेमेटरी गुण हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं, ज्यामुळे इम्यूनिटीही बूस्ट होते.
आवळ्याच्या चहासाठी साहित्य
१ छोटा चमचा आवळा पावडर
१ छोटा तुकडा बारीक केलेलं आलं
१ चमचा मध
२ कप पाणी
कसा बनवाल चहा?
एका भांड्यात २ कप पाणी टाका. नंतर त्यात एक चमचा आवळा पावडर टाका आणि सोबतच बारीक केलेलं आलंही टाका. त्यानंतर हे पाणी ५ ते ७ मिनिटं कमी गॅसवर उकडू द्या. नंतर गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध टाका. तुमचा हेल्दी आवळा चहा तयार आहे. जर हा चहा सकाळी उपाशीपोटी प्याल तर वजन कमी होईल आणि पचन तंत्रही मजबूत होईल. सोबतच बॉडी डिटॉक्स आणि लिव्हर डिटॉक्सही होईल.