Right Time to Eat Rice: वजन वाढल्याचा विषय निघाला की भाताचा विषय निघणार नाही, असं होऊच शकत नाही. कारण जास्तीत जास्त लोकांना वाटतं की, भात खाल्ल्यानं वजन वाढतं. भारतीय घरांमध्ये भात रोज खाल्ला जातो. भात वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. अनेकांचं तर भात खाल्ल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. भातासंबंधी अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. जे लोक वाढलेल्या वजनामुळे हैराण आहेत त्यांना तर नेहमीच काहीना काही प्रश्न पडलेले असतात. त्यातील एक प्रश्न म्हणजे रात्री भात खावा की नाही?
जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढतं, पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि भातामुळे झोपही व्यवस्थित होत नाही. अशात याबाबत एक्सपर्ट काय सांगतात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. खरंच रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? तसेच भात खाण्याची योग्य वेळ कोणती हे याबाबत जाणून घेऊ.
काय सांगतात एक्सपर्ट?
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यानी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर भाताबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ते म्हणाले की, 'भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. म्हणजे भात खाल्ल्यावर लवकर पचतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगानं वाढू शकते. अशात जर तुम्ही रात्री भात खाल्ला तर यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होतं. अशात वजन लवकर वाढतं. सोप्या भाषेत सांगायचं तर रात्री भात खाल्ल्यानं लठ्ठपणा वाढू शकतो'.
भात खाण्याची योग्य वेळ
रात्री भात खायचा नाही मग भात खाण्याची योग्य वेळ कोणती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, 'भात तुम्ही दिवसा कोणत्याही वेळी संतुलित प्रमाणात खाऊ शकता. पण जर तुम्हाला लठ्ठपणा टाळायचा असेल आणि तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही दुपारच्या वेळी भात खाऊ शकता'.
न्यूट्रिशनिस्टनुसार, 'भात खाण्याची सगळ्यात योग्य वेळ दुपारची आहे. दुपारच्या जेवणावेळी शरीर जास्त अॅक्टिव राहतं, सोबतच यावेळी आपलं पचन तंत्र सक्रिय होतं. ज्यामुळे भात सहजपणे पचन होतो. त्यामुळे प्रयत्न करा की, रात्रीऐवजी भात दुपारी खावा'.
भात खाण्याची योग्य पद्धत
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, भात शिजवल्यानंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतरच खा. फ्रिजमध्ये भात ठेवल्यानं त्यातील स्टार्चचं प्रमाण कमी होतं. यामुळे भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. अशात ब्लड शुगर लेव्हलमध्ये वेगानं चढ-उतार होत नाही.
तसेच एक्सपर्टनी सांगितलं की, भात खाण्याआधी नेहमीच फायबर आणि प्रोटीन असलेल्या गोष्टी खाव्यात. यासाठी तुम्ही आधी भाजी-चपाती खाऊ शकता आणि त्यानंतर भात खाऊ शकता. या काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला आवडता भातही खाता येईल आणि वजनही वाढणार नाही.