Right way of eating curd : उन्हाळ्यात भरपूर लोक दह्याचा आहारात समावेश करतात. कारण दही थंड असतं. ज्यामुळे वाढत्या तापमानात शरीरही आतून थंड ठेवण्यास मदत मिळते. सोबतच याची आंबट गोड चव सगळ्यांनाच आवडते. इतकंच नाही तर दह्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये प्रोटीनसोबत कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर असतात. दह्यातील व्हिटॅमिनन्समुळे शरीराची इम्यूनिटी सुद्धा वाढते.
विषय जेव्हा प्रोटीन (Protein) चा येतो तेव्हा शाकाहारी लोक डेअरी प्रोडक्ट, डाळी आणि ड्रायफ्रुट्सच्या माध्यमातून ते मिळवतात. दह्यातही प्रोटीन भरपूर असतं. पण शरीराच्या गरजेनुसार, केवळ एक वाटी दह्यातून पुरेसं प्रोटीन मिळत नाही. अशात योग्य पद्धतीनं दही खाल्लं तर भरपूर प्रोटीन मिळवता येऊ शकतं. यासाठी डॉक्टर सिद्धांत भार्गव यांनी दही खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
दही खाण्याची योग्य पद्धत
डॉ. सिद्धांत भार्गव म्हणाले की, जर तुम्ही शाकाहारी असाल तर दही प्रोटीन मिळवण्यासाठी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरतं. मात्र दह्यातून जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी दह्यासोबत एक ट्रिक करावी लागेल. कारण केवळ एक वाटी दही खाऊन शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन मिळत नाही.
दह्यातून जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही हंग कर्ड खायला हवं. म्हणजे दही एका कापडामध्ये बांधून एखाद्या भांड्यात लटकवून ठेवा. ज्यामुळे दह्यातील सगळं पाणी निघून जातं. 100 ग्रॅम हंग कर्डमध्ये 10 ग्रॅम प्रोटीन असतं. महत्वाची बाब म्हणजे दह्यातून निघालेलं पाणी अजिबात फेकायचं नाहीये. डॉक्टर म्हणाले की, या पाण्यातही भरपूर प्रोटीन असतं. याचा वापर तुम्ही सूप बनवण्यासाठी करू शकता किंवा डाळीमध्ये टाकू शकता. तसेच पीठ मळण्यासाठी देखील वापर करू शकता.
दही खाण्याचे फायदे
दही नियमितपणे खाल्ल्यानं शरीराची इम्यूनिटी वाढते. तसेच यातून शरीराला प्रोबायोटिक्सही मिळतात. दही वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर दही हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं. तसेच दही त्वचा आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा दूर करतं.