Benefits of boiling pomegranate peel: डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानलं जातं. तो खाल्ल्याने शरीराला एकाच वेळी अनेक फायदे मिळतात, हे बहुतेक लोकांना माहीत आहे. त्यामुळे आपण आवडीने डाळिंबाचे दाणे खातो आणि त्याची साल मात्र निरुपयोगी समजून फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की डाळिंबांच्या दाण्यांसोबतच त्याची सालसुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते?
याबाबत डायटिशिअन श्रेया गोयल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की, डाळिंबाची साल आरोग्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. योग्य पद्धतीने वापर केल्यास ती शरीराला आतून मजबूत आणि निरोगी बनवू शकते. खासकरून डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला हर्बल चहा खूप फायदेशीर ठरतो. चला तर मग, हा चहा कसा बनवायचा आणि तिचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
डाळिबांच्या सालीचा हर्बल चहा कसा बनवावा?
सर्वप्रथम डाळिंबाच्या साली स्वच्छ पाण्याने नीट धुवा. नंतर त्या पाण्यात टाका आणि 10–15 मिनिटं उकळवा. पाण्याचा रंग बदलू लागला की गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. चव वाढवण्यासाठी हवे असल्यास थोडेसे मध मिसळू शकता.
डाळिंबाच्या सालीचा चहा पिण्याचे फायदे
पचन सुधारतं
डायटिशिअन सांगतात की, डाळिंबाच्या सालींमध्ये असे घटक असतात जे पचनसंस्थेला मजबूत करतात. गॅस, अपचन आणि पोटाच्या तक्रारींमध्ये हे उपयुक्त ठरू शकते.
अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर
डाळिंबाच्या सालीच्या या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससोबत लढतात. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते.
इम्युनिटी वाढवते
नियमितपणे डाळिंबाच्या सालीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळतं. तसेच याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत मिळते आणि लिव्हर निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरतं.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
डाळिंबाच्या सालींमधील पोषक घटक हृदयाच्या आरोग्याला आधार देतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
या गोष्टींची काळजी घ्या
दिवसातून एकदाच हे पाणी प्या. कोणताही गंभीर आजार असल्यास किंवा औषधे सुरू असतील, तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती महिलांनी याचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करावे.
