Join us

बटाटे वडे, कांदा भजी नेहमीचीच, पावसाळ्यात बनवा खमंग डाळ वडा, घ्या झटपट सोपी रेसिपी…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 16:11 IST

Dal Wada Recipe Monsoon Special : हे वडे करायला अतिशय सोपे असून पोटभरीचे असल्याने यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा.

पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर पाऊस पडला आणि हवेत गारवा असला की आपल्याला चमचमीत, गरम काहीतरी छान खावेसे वाटते. मग कधी बटाटे वड्याचा बेत होतो तर कधी कांदा भजीचा. झणझणीत आणि कुरकुरीत असे हे गरम पदार्थ खाल्ले की आपल्याला फार बरं वाटतं. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पदार्थ खूप आवडतात. गाड्यांवर मिळणारे हे पदार्थ अनेकदा बाहेरही आवडीने खाल्ले जातात. मात्र नेहमी तेच तेच करुन आणि खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण वड्याचीच थोडी वेगळी आणि खमंग अशी रेसिपी पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून केले जाणारे, पौष्टीक आणि झटपट होणारे हे वडे करायला अतिशय सोपे असून पोटभरीचे असल्याने यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा (Dal Wada Recipe Monsoon Special). 

साहित्य -

१. तांदूळ - ३ वाट्या 

२. हरभरा डाळ - १ वाटी 

(Image : Google)

३. मूग डाळ - १ वाटी

४. हळद - अर्धा चमचा 

५. तिखट - १ चमचा 

६. धणेजीरे पावडर - १ चमचा 

७. तीळ - १ चमचा 

८. कांदा - २

९. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी 

१०. तेल - २ वाट्या 

११. मीठ - चवीनुसार 

१२. दही - अर्धी वाटी 

कृती

१. तांदूळ, दोन्ही डाळी पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी भिजवून घ्या.

२. मिक्सरमध्ये हे सगळे थोडे जाडसर बारीक करुन घ्या.

३. मग यामध्ये दही आणि मीठ घालून हे चांगले एकजीव करा. 

४. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, हळद, तीळ, धणेजीरे पावडर घालून पुन्हा चांगले मळून घ्या.

५. कढईत तेल घालून ते गरम करायला ठेवा.

६. हातावर एकसारखे वडे थापून हे वडे तेलात खमंग तळून घ्या.

७. हे वडे मिरच्या, दही, सॉस, लोणचे, हिरवी चटणी अशा कशासोबतही अतिशय चांगले लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मोसमी पाऊस