डाळ- वरण तयार करण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे. (Dal premix recipe, Add a spoonful of powder to hot water, instant dal recipe, make this powder )घरापासून दूर राहणाऱ्यांसाठी किंवा रोज जेवण करण्याची घाई होत असेल तर हे प्रिमिक्स करुन ठेवा. पाण्यात उकळले की वरण तयार होते. करायला सोपे आहे.
साहित्य
तूरडाळ, मूगडाळ, मसूर डाळ, हिरवी मूग डाळ, तूप, काश्मीरी लाल मिरची, हळद, मोहरी, हिंग, जिरे, लाल तिखट, कडीपत्ता , मीठ
कृती
१. सगळ्या डाळी समप्रमाणात घ्यायच्या. एक वाटी तूरडाळ घेतल्यावर एक वाटी मूगडाळ घ्यायची. तसेच एक वाटी मसूर डाळ घ्यायची आणि एक वाटी हिरवी म्हणजेच अख्खी मूगडाळ घ्यायची. सगळ्या डाळी एकत्र करायच्या आणि स्वच्छ धुवायच्या. दोन ते तीन पाण्यातून काढायच्या. नंतर थोडावेळ पाण्यात ठेवा. अगदी पाच मिनिटे ठेवा. जास्त वेळ नको. धुवून झाल्यावर त्यातील पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचे. मग एका कोरड्या कॉटनच्या फडक्यावर डाळी पसरवायच्या. जरा वाळवायच्या. कापडाने टिपायच्या.
२. एका कढईत डाळी घ्यायच्या आणि भाजायच्या. मंद आचेवर भाजा म्हणजे करपणार नाही. त्यातील पाणी संपूर्ण गायब होईपर्यंत परता. डाळी जरा कुरकुरीत होतील. मग गॅस बंद करा आणि डाळींचे मिश्रण गार करत ठेवा. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि मस्त वाटून घ्या. पूड तयार करायची. लगदा होईल एवढे वाटू नका. मात्र सगळ्या डाळी एकसमान वाटल्या जातील याची काळजी घ्यायची. मस्त सरसरीत पूड तयार करायची.
३. एका कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यावर मोहरी घालायची आणि मस्त परतायची. तसेच जिरे आणि कडीपत्ताही घालायचा. त्यात मीठ आणि हळद घालायची. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि मग लाल तिखटही घालायचे. छान परतायचे आणि तयार केलेली डाळींची पूड घालायची. व्यवस्थित ढवळायची. सगळे मसाले एकजीव करायचे आणि मग छान खमंग परतून घ्यायचे. गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवायचे.
४. वरण तयार करताना फोडणी करायची. त्यात ही पावडर दोन चमचे घालायची. पाणी घालायचे आणि पूड मस्त उकळायची. कांदा, लसूण, मिरची आवडीनुसार घालू शकता. मस्त लागते आणि झटपट होते.