Join us

वाटीभर पोहे आणि दोन बटाटे; नाश्त्याला करा कुरकुरीत पोहे-बटाटा शंकरपाळे, सुटीसाठी खास खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2023 13:05 IST

Crispy Poha Potato Namkeen Recipe : मुलांना खाऊच्या डब्यात काही वेगळे द्यायचे असेल तरी हा पर्याय अतिशय छान आहे.

रोज नाश्त्याला काय करायचा असा एक प्रश्न महिलांना सतत सतावत असतो. मग पोहे, उपीट झाले की फोडणीचा भात नाहीतर फोडणीची पोळी ठरलेलीच असते. पण सतत हे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि नाश्त्याला वेगळं काहीतरी हवं असं आपल्याला वाटतं. घरात आहेत त्याच पदार्थांपासून पण तरी चविष्ट आणि वेगळा असा एखादा पदार्थ केल्यास सगळेच आवडीने खातात. पोहे आणि बटाटा हे मुख्य पदार्थ वापरुन करता येतील अशा कुरकुरीत पुऱ्या एकदा ट्राय करुन पाहा. आदल्या दिवशी रात्री थोडी तयारी केलेली असेल तर झटपट होईल असा हा पदार्थ नाश्ता म्हणून खायला तर छानच वाटतो. पण मुलांना खाऊच्या डब्यात काही वेगळे द्यायचे असेल तरी हा पर्याय अतिशय छान आहे. पाहूयात हा हटके पदार्थ कसा करायचा (Crispy Poha Potato Namkeen Recipe)...

साहित्य -

१. पोहे - १ वाटी 

२. उकडलेले बटाटे - १ वाटी 

३. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा 

४. जीरं - १ चमचा 

५. ओवा - १ चमचा 

६. टिली फ्लेक्स - अर्धा चमचा 

७. कोथिंबीर - २ चमचे 

८. मीठ - चवीनुसार

९. तेल - २ वाट्या

कृती -

१. पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आणि मिक्सरवर बारीक पूड करायची.

२. बारीक केलेली ही पूड एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये ओवा, जीरं, मीठ आणि चिली फ्लेक्स घालायचे. 

३. यात आलं लसूण पेस्ट, उकडून स्मॅश केलेला बटाटा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

४. आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे छान घट्टसर पीठ मळून घ्यायचे. 

५. कणकेच्या गोळ्याप्रमाणे गोळा घेऊन याच्या पोळ्या लाटायच्या. 

६. कडेचे भाग काढून टाकायचे आणि मध्यभागी असलेले चौकोनी भाग वेगळे ठेवायचे. 

७. हे शंकरपाळ्याच्या आकाराचे चौकोनी भाग तेलात तळून घ्यायचे आणि थोडं गार झालं की हे खायला घ्यायचं.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.