Join us

Crispy Pakoda Recipe : भजी बनवायचीये पण बेसन पीठ संपलंय? मग 'हे' पदार्थ वापरून बनवा खमंग, कुरकुरीत भजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:19 IST

Crispy Pakoda Recipe : चण्याच्या पीठाचा डबा रिकामा असेल तर टेंशन घेण्याची काहीच गरज नाही इतर पर्याय वापरून तुम्ही खमंग, खुसखुशीत भजी बनवू शकता. 

ठळक मुद्देबाहेरचं सारखं खाल्लं की लगेच खोकला, कफ जाणवतात. पण घरच्याघरी तयार केलेली भजी फारशी बाधत नाही. कारण घरी शक्यतो सगळं फ्रेश साहित्य वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात.

कुरकुरीत, खमंग भजी खाण्याचा आणि बनवण्याचा मूड कधी होईल काही सांगता येत नाही. जरा ढगाळ वातावरण झालं, पाऊसाच्या सरी बसरू लागल्या किंवा उपवास सोडायला काहीतरी स्पेशल बनवयाचं असेल तर सगळ्यांनाच भजी आठवतात. भजी बनवण्यासाठी जास्तवेळही लागत नाही गरमागरम भजी जीभेवर ठेवताच वेगळाच आनंद मिळतो. अनेकजण पावासोबत, तोंडी लावायला, चटणीत बुडवून किंवा गरमगरमा गरम चहासोबत भजीचा आनंद घेतात. 

बाहेरचं सारखं खाल्लं की लगेच खोकला, कफ जाणवतात. पण घरच्याघरी तयार केलेली भजी फारशी बाधत नाही. कारण घरी शक्यतो सगळं फ्रेश साहित्य वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात. भजी म्हटली  बेसन पीठ आलंच. अनेकदा घरातलं बेसन पीठ संपलेलं असतं आणि भजी करायच्या असतात. अशावेळी काय करावं सुचत नाही. चण्याच्या पीठाचा डबा रिकामा असेल तर टेंशन घेण्याची काहीच गरज नाही इतर पर्याय वापरून तुम्ही खमंग, खुसखुशीत भजी बनवू शकता. 

तांदळाचं पीठ

अनेकदा पॅटीस किंवा भजी करताना कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाच्या पीठाचा वापर केला जातो. तुम्ही केवळ तांदळाच्या पिठाचा वापर करून तुम्ही छान भजी तळू शकता. तांदळाचे पीठ भिजवताना लक्षात घ्या की पाण्याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही ताकाचा वापर करा. या भजीमध्ये जास्त तेल लागण्याची शक्यता असते म्हणून  भजी तळून झाल्या की टिश्यू पेपरवर ठेवा. 

उडदाची डाळ

भिजवलेल्या उडदाच्या डाळीचं वाटलेलं मिश्रण तुम्ही भजी तयार करण्यासाठी वापरू शकता. आपल्याला हवं त्यानुसार जाडसर अथवा पातळ भजीनुसार तुम्ही हे भिजवून घ्या. बॅटर जास्त पातळ असू नये. कारण पातळ बॅटर असेल तर डाळीचं मिश्रण व्यवस्थित चिकटणार नाही. शिवाय भजी जास्त तेल शोषून घेईल.

रवा

भजीसाठी तुम्ही ४ ते ५ चमचे रवा घ्या. २-३ चमचे तांदळाचे पीठ एकत्र करा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये. कांदा, मिरची, मीठ हे साहित्य तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून तळून घ्या. रव्याचं पीठ वापरल्यानं भजी अधिक कुरकुरीत होतात.

शिंगाडा पीठ

शिंगडा पीठ उपवासाच्या रेसेपीसाठी घरी आणून ठेवलेलं असतं. त्याचा वापर तुम्ही भजीसाठीसुद्धा करू शकता.  त्यासाठी तुम्ही 1 कप शिंगाडा पीठ घ्या. हे पीठ अतिशय पातळ भिजवू नका. भजीसाठी लागणारं साहित्य या पीठात घोळवून कुरकुरीत भजी तळून घ्या.

गव्हाचं पीठ

आता तुम्हाला वाटलं असेल गव्हाच्या पीठानं भजी गचगचीत होईल. पण भजी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पीठात 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे रवा घालून पीठ भिजवा. या पिठात  भजी घोळवून तळा. या पीठांच्या मिश्रणानं अप्रतिम भजी तयार होतात. 

टॅग्स :अन्नपाककृती