वजन कमी करायचे असेल, हृदयाचे काही त्रास असतील, श्वसनाचे किंवा पचनाचे त्रास असतील या सगळ्याचा संबंध शरीराच्या विविध सवयींशी असतो. त्यापैकी एक म्हणजे आहार. चुकीचा आहार घेण्याची सवय आणि आरोग्यासाठी चांगले नसलेले पदार्थ खाणे. त्यापैकी एक म्हणजे तेल. रोजच्या आहारात तेल महत्त्वाचे आहे. मात्र तेल शरीरासाठी चांगले नाही. हे आपण जाणून आहोत. सगळेच पदार्थ ओ ऑइल कुकींचा भाग नसतात मात्र काही भाज्या तेलाची फोडणी न करताही होतात.
तेल न वापरता केलेल्या भाज्या चवीला हलक्या लागतात, पचनास सोप्या असतात आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. योग्य पद्धतीने शिजवल्यास अशा भाज्या रुचकरही लागतात. तेल न वापरता करता येणाऱ्या भाज्यांमध्ये दुधी भोपळ्याचा भाजीचा समावेश होतो. दुधी भोपळा रसाळ असल्यामुळे तो त्याच्याच पाण्यात छान शिजतो. त्यात फक्त मीठ, हळद, जिरे आणि थोडी हिरवी मिरची घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवली तर हलकी व पौष्टिक भाजी तयार होते.
दोणक्याची (घोसावळ्याची) भाजी देखील तेलाविना छान होते. बारीक चिरलेले दोणके, मीठ, हळद, थोडे धणे-जिरे पूड आणि कोथिंबीर, शेंगदाण्याचे कुट घालून मंद आचेवर शिजवले की पोटाला थंडावा देणारी भाजी तयार होते.
कोबीची भाजी तेल न वापरता करता येते. कोबी चिरून त्यात मीठ, हळद, मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवले की कोबी पाण्यावर नीट शिजते. शेवटी थोडा लिंबाचा रस घातल्यास चवही खुलते.
फ्लॉवरची भाजी वाफवून किंवा थोड्या पाण्यावर शिजवून करता येते. फ्लॉवरचे तुकडे, मीठ, हळद, आलं-मिरची पेस्ट घालून झाकण ठेवले की छान मऊ भाजी होते.
टोमॅटो-डाळीची पातळ भाजी किंवा उसळीसारखी भाजी देखील तेलाविना करता येते. टोमॅटोचा रस, उकडलेली डाळ, मीठ, हळद आणि जिरे घालून उकळी दिली की चवदार आणि हलकी भाजी तयार होते.
तेल न वापरल्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे कॅलरी कमी होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा भाज्या पचनासाठी हलक्या असल्यामुळे आम्लपित्त, जडपणा किंवा पोटफुगीचा त्रास कमी होतो. हृदयाचे आरोग्य चांगले राहते कारण अनावश्यक चरबी शरीरात साचत नाही. कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी होतो आणि रक्तवाहिन्यांवर ताण येत नाही. याशिवाय भाज्यांचा मूळ स्वाद टिकून राहतो आणि त्यातील पोषणतत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतात.
