Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेथी मटार पनीर एकत्र करुन भाजी केली आहे का? एकदा कराच ही टेस्टी आणि हेल्दी भाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 20:24 IST

मेथी मटार पनीर हे काॅम्बिनेशन केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. खूप मसाले नाही तरीही चविष्ट लागणारी भाजी आरोग्यासही आहे फायदेशीर.

ठळक मुद्देया भाजीच्या ग्रेव्हीसाठी कांदा, टमाटे हे नुसते मऊ होवून एकजीव होईपर्यंत परतावे लागतात.  मटार आणि मेथी आधी न शिजवता मसाल्यात परतून मऊ होवू दिल्यास मेथीचा अर्क भाजीत चांगला उतरतो.

 हिवाळ्यात मटार, मेथी या भाज्या इतक्या मुबलक मिळतात आणि इतर सिझनपेक्षा तुलनेने स्वस्तही असतात. त्यामुळे या भाज्या हिवाळ्यात वरचेवर खाल्ल्या जातात. तसेच कधी मेथी मटार तर कधी मटार पनीर असे पौष्टिक मेळ घालून चविष्ट भाज्या केल्या जातात.  पण मेथी मटार पनीर अशी एकत्र भाजी केली आहे का? हे काॅम्बिनेशन जितकं चविष्ट तितकंच पौष्टिकही असतं. करुन पाहा.  विशेषत: मुलांसाठी हे काॅम्बिनेशन खूपच सही आहे. कारण मुलांना नुसती मेथीची भाजी खायला किंवा नुसती मटाराची ऊसळ खायला आवडत नाही. त्यांना ही मेथी मटार पनीर हे काॅम्बिनेशन नक्की आवडेल आणि आरोग्यदृष्ट्या त्यांच्या फायद्याचंही ठरेल. 

Image: Google

 कशी कराल मेथी मटार पनीरची भाजी?

मेथी मटार पनीरची भाजी करण्यासाठी पाव किलो पनीर,  1 कप मेथी, 1 कप मटार दाणे, 4 कांदे कापलेले, 3 टमाटे कापलेले, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल घ्यावं. 

Image: Google

मेथी मटार पनीर करताना आधी कढईत थोडं तेल घालून कांदा, मिरची परतून घ्यावी. नंतर कापलेले टमाटे, मेथी आणि मटारचे दाणे घालून ते हलकेसे परतून घ्यावेत. मेथी, टमाटे, मटारचे दाणे मऊ होवू द्यावेत. नंतर यात लाल तिखट आणि मीठ घालावं. तेल सुटेपर्यंत हे परतावं. आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही हवी तेवढं पाणी त्यात घालावं. ग्रेव्ही उकळू द्यावी. मग या ग्रेव्हीत पनीरचे तुकडे टाकवेत. पनीर ग्रेव्हीत नीट मिसळून घ्यावं. मग यात गरम मसाला घालावा. भाजी 5 मिनिटं मंद आचेवर ठेवावी. नंतर गॅस बंद करुन वरुन कोथिंबीर भुरभुरुन भाजी झाकून ठेवावी.  ही भाजी पोळी, पराठे, नान, भाकरी किंवा नुसत्या भातसोबतही छान लागते.  

टॅग्स :अन्नकिचन टिप्सआहार योजना