Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिरच्या चिरल्या - लसूण सोलला की हाताची आग होते? ३ उपाय - काम होईल सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 10:05 IST

Chopping Chili - Peeling Garlic causes burn? 3 Solutions - Work will be easy, must try : हाताची आग अजिबात होणार नाही. करा ३ सोपे उपाय.

स्वयंपाकघरात मिरची, लसूण, कांदा यांसारखे पदार्थ वापरताना अनेकांना हातांची आग, नखांखाली वेदना जाणवतात किंवा डोळ्यांत पाणी येण्याचा त्रास होतो. मिरचीत असणारे कॅप्सेसिन आणि फोडणीतील तिखट वास हे यामागचे मुख्य कारण असते. मात्र थोडी काळजी आणि घरगुती उपाय केल्यास हा त्रास सहज टाळता येतो. कोणताही तिखटाचा पदार्थ हाताळताना किंवा हाताळून झाल्यावर पाहा काय करावे. 

मिरची चिरताना किंवा तिखट पदार्थ करताना हातांची आग होऊ नये यासाठी आधी हातांवर थोडेसे तेल लावावे. खोबरेल तेल सगळ्यात उत्तम. तेल नको तर मग तूप चोळा. त्यामुळे मिरचीतील तिखटपणा थेट त्वचेत शोषला जात नाही. मिरची चिरल्यानंतर हात फक्त पाण्याने धुण्याऐवजी बेसनाने धुवावेत. यामुळे कॅप्सेसिन निघून जाते आणि आग कमी होते. हातांवर जास्त जळजळ होत असल्यास थंड दुधात किंवा ताकात काही वेळ हात बुडवून ठेवल्यास लगेच आराम मिळतो. साधे पाणी घेऊन त्यात हात बुडवून बसा. पाणी हळूहळू कोमट होते. कारण हातावरील तिखटाचा अंश त्यात उतरायला लागतो.

फोडणी करताना डोळ्यांची आग होणे, पाणी येणे हा त्रासही अनेकांना होतो. हे टाळण्यासाठी फोडणी करताना गॅस मंद आचेवर ठेवावा आणि तिखट, मोहरी किंवा जिरे टाकताना थोडे अंतर ठेवून उभे राहावे. स्वयंपाकघरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, एक्झॉस्ट फॅन किंवा खिडकी उघडी ठेवावी. फोडणी करताना झाकण अर्धवट ठेवले तरी तिखट वाफ थेट डोळ्यांत जाणार नाही. काही जण कांदा किंवा लिंबाचा तुकडा जवळ ठेवल्यासही डोळ्यांची आग कमी होते असे सांगतात.

लसूण सोलताना अनेकदा नखं दुखतात किंवा नखांखाली आग होते. यासाठी लसूण सोलण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यात भिजत ठेवावा. त्यामुळे साल सहज निघते आणि नखांवर ताण येत नाही. नखं खूप दुखत असतील तर लसूण सोलताना थोडेसे तेल बोटांना लावावे किंवा सिलिकॉन, रबर ग्लोव्हज वापरावेत. लसूण सोलल्यानंतर नखांखाली आग होत असल्यास थंड पाणी, बर्फाचा तुकडा किंवा अ‍ॅलोवेरा जेल लावल्यास आराम मिळतो.

या छोट्या-छोट्या उपायांनी स्वयंपाक करताना होणारी हातांची आग, डोळ्यांची जळजळ आणि नखांचा त्रास नक्कीच कमी करता येतो. थोडीशी काळजी घेतली तर स्वयंपाक करणे अधिक आरामदायी आणि आनंददायी ठरते.

टॅग्स :अन्नहोम रेमेडीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स