Cloves in Summer : भारतीय स्वयपाकघरात एकापेक्षा एक टेस्टी आणि हेल्दी मसाल्यांचा खजिना लपलेला असतो. काही बारीक, काही मोठे असणारे हे मसाले मोठ्या कामाचे ठरतात. असाच एक छोटा मसाला म्हणजे छोटीशी दिसणारी लवंग. गरम मसाल्यात वापरली जाणारी लवंग ही उष्ण असते आणि त्यामुळे हिवाळ्यात याचा वापर अधिक वाढतो. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांची चव देखील वाढण्याचं काम लवंग करते आणि सोबतच सर्दी-पडसा, दातांचं दुखणं देखील दूर करते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यातही लवंग खाता येते किंवा खाल्ली पाहिजे का? यावर आयुर्वेद काय सांगतं पाहुयात.
आयुर्वेदात लवंगला उष्ण मानली जाते. तरी सुद्धा लवंग उन्हाळ्यातही आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. अशात उन्हाळ्यात लवंगाचे काय फायदे मिळतात आणि याचा वापर कसा करावा हे माहीत असणं गरजेचं ठरतं. याबाबत आयुर्वेद डॉक्टर चंचल शर्मा यांनी माहिती दिली आहे.
लवंगाचे फायदे
उष्णतेपासून संरक्षण
लवंग योग्य प्रमाणात घेतल्यास उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून संरक्षण मिळू शकते. ती शरीरातील कफ आणि पित्त संतुलित ठेवण्यास मदत करते.
ब्लड सर्क्युलेशन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर
लवंग खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते.
तोंडाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया कमी करते
उन्हाळ्यात तोंड कोरडे पडणे (डिहायड्रेशन) ही समस्या सामान्य आहे. लवंग चघळल्यास तोंडात लाळ निर्माण होते. बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. म्हणून लवंग नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून वापरता येते.
पचनासाठी उपयुक्त
लवंग जठराग्नी वाढवते, त्यामुळे अन्न पचायला मदत होते. पोटाशी संबंधित त्रासांमध्येही आराम मिळू शकतो. म्हणजेच काय तर लवंग उष्ण असली तरी योग्य प्रमाणात वापरल्यास ती उन्हाळ्यातही फायदेशीर ठरू शकते.
उन्हाळ्यात कशी खाल लवंग?
उन्हाळ्यात लवंग एक किंवा दोन खाणं भरपूर होईल. थेट खाण्याऐवजी तुम्ही याचं पाणीही पिऊ शकता. इतकंच नाही तर भाजीच्या तडक्यातही लवंग टाकू शकता. रात्री एक ग्लास पाण्यात दोन लवंग भिजवून ठेवा आणि हे पाणी सकाळी प्या. जास्त प्रमाणात लवंग खाल तर पोटात जळजळ, जुलाब किंवा स्किन इरिटेशनची समस्या होऊ शकते.
