lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे!

केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे!

आप्पेपात्रात केक करणं आणि तो ही झटकेपट ही आयडियाच किती भारी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 01:49 PM2021-07-28T13:49:59+5:302021-07-28T13:56:09+5:30

आप्पेपात्रात केक करणं आणि तो ही झटकेपट ही आयडियाच किती भारी आहे.

Cakeappe: Make a small appe/appam size cake in just 20 minutes, in appam patra. | केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे!

केकप्पे: आप्पेपात्रात करा छोटे केक फक्त 20 मिनिटात, त्याचंच नाव केकप्पे!

Highlights“प्लीज माझ्यासाठी केक बनवशील का?” या संकटावर काढलेलं असंच एक चतुर उत्तर…( सर्व छायाचित्रं -गौरी पटवर्धन)

गौरी पटवर्धन 

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आयांचं आणि काही प्रमाणात बाबांचं सगळ्यात खतरनाक नुकसान काय झालं असेल, तर त्यांनी जिवापाड जपलेली सिकेट्स बाहेर आली. ज्या गोष्टी त्यांना होता होईल तोवर मुलांना कळू द्यायच्या नव्हत्या त्या मुलांना समजल्या. म्हणजे कुठल्या गोष्टी? तर जगातले अनेक पदार्थ हे केवळ बाजारात किंवा हॉटेलात मिळतात अशी घरोघरीच्या चतुर आईबाबांनी मुलांची समजूत करून दिलेली होती. त्यातलाच एक केक. पिझ्झा, पास्ता, (पाकिटातील नव्हे…) चॉकलेट्स, बिस्किट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, केक असे अनेक पदार्थ केव्हातरी बाहेर गेल्यावर खायचे किंवा केव्हातरी कोणीतरी खाऊ म्हणून आणून देतं तेव्हा खायचे असं सेटिंग आईबाबांनी लावलेलं होतं. 

पण मग कोव्हीड १९ या व्हिलनने एंट्री मारली. २०२० साली देशभर कडक लॉकडाऊन लागला. घरोघरीच्या मुलांना घरात होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा वीट येऊ लागला. पण बेकरी बंद, दुकानं बंद, भाज्या जेमतेम मिळत होत्या अशा काळात लहान मुलांचे जंक फूडचे हट्ट पुरवायचे कसे?
मग नाईलाजाने आयांनी आणि काही घरातील बाबांनी हळूहळू कबूल करायला सुरुवात केली, की “आम्ही कॉलेजला असतांना केक करायचो.”
“फ्रेंच फ्राईज घरीसुद्धा करता येतात.”
“युट्युबवर बघून कढईत लादीपाव बनवता येतात.”
“बिस्किट्स कूकरमध्ये होऊ शकतात.”
एकदा ही महत्वाची माहिती मुलांच्या हाती लागल्यावर ते कशाला सोडतायत? आणि खरं सांगायचं तर मागच्या वर्षी आईबाबांनाही हौस होती. वर्क फ्रॉम होमची नवलाई होती. मग लोकांनी अक्षरशः प्रोफेशनल केकसुद्धा घरी करून बघितले. आणि आता ते सगळं अंगाशी येतंय. मुलं केव्हाही उठून केक, पिझ्झा, फोकाशिया ब्रेड असलं काय काय मागतात. पालकांना ते करायला वेळ आणि ऊर्जा उरलेली नाही. पण मुलांना नकारही देता येत नाही. कारण आता सगळी परिमाणं बदलली आहेत. वर्क फ्रॉम होममध्ये आईबाबा आणि ऑनलाईन शाळेत मुलं अक्षरशः पिचली आहेत.
पण अशा किंवा कुठल्याही परिस्थिती हार मानतील तर ते आई-बाबा-आजी-आजोबा-आत्या-मावशी-काका-मामा-ताई-दादा कसले? त्यांनी त्यातून मार्ग काढलेच आहेत. नको त्या वेळी अंगावर आलेल्या “प्लीज माझ्यासाठी केक बनवशील का?” या संकटावर काढलेलं असंच एक चतुर उत्तर… केकप्पे!
आप्पेपात्रात केलेले छोटे छोटे केक्स.
आप्पेपात्रात आणि केक? विश्वास नसेल बसत तरी घ्या कृती, आणि करुन पहा..

साहित्य प्रमाण 


१ अंडं
लोणी, पिठीसाखर, कणीक प्रत्येकी अर्धी वाटी
कोको पावडर 3 चमचे घातली तर चॉकलेट केक होतो.
अर्धा चमचा बेकिंग पावडर
व्हॅनिला इसेन्स पाव चमचा

कृती 

लोणी, पिठीसाखर, अंडं, बेकिंग पावडर आणि कोको घातलेली कणीक, व्हॅनिला इसेन्स या क्रमाने मिसळणे. आप्पे पात्रात थेंबभर तूप घालून केक करायला ठेवणे. 10  मिनिटात दोन्ही बाजू भाजून होतात.
या प्रमाणात 12-15 केकाप्पे होतात. आणि मस्त सजवून खाताही येतात लगेच, ताजेताजे!

Web Title: Cakeappe: Make a small appe/appam size cake in just 20 minutes, in appam patra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.