Join us

वांग्यांचे खरपूस भरीत, अस्सल गावरान रेसिपी ! हा झणझणीत मामला करून पहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 17:33 IST

वांग्याचं भरीत आणि भाकरीचा बेत म्हणजे अहाहा.... सोबत खमंग ठेचा आणि चटपटीत लोणचे... असा झकास बेत करायचा म्हणजे भरीताची चव तर जमायलाच हवी...

ठळक मुद्देया रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे जर खास भरीताची मोठी वांगी उपलब्ध नसतील तरी चालते. भाजीसाठी असणारी मध्यम आकाराची वांगीही आपण या रेसिपीमध्ये वापरू शकतो.

भरीत आणि भाकरी म्हणजे अनेक जणांचा आवडीचा बेत. विदर्भाचे आणि खान्देशाचे भरीत म्हणजे मिरचीचा तडका, मराठवाडी भरीत म्हणजे तिखटाचा झणका तर पश्चिम महाराष्ट्राचे भरीत म्हणजे शेंगादाण्यांची लज्जत... अशा कोणत्याही पद्धतीने केलेले भरीत म्हणजे खवय्यांच्या तोंडाला सुटलेले पाणी.. आता विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भरीताची खासियत एकाच भरीतात जमून आली तर बात काही औरच....  म्हणूनच अशी ही भन्नाट रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा..

 भरीत करण्यासाठी लागणारे साहित्यवांगे, हिरव्या मिरच्या, लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ

भरीत करण्याची कृती१. सगळ्यात आधी तर वांग्यांचे काटे काढून घ्या आणि वांग्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्या.२. यानंतर तेल लावलेले वांगे गॅसवर थेट ठेवून द्या आणि चांगले काळे पडेपर्यंत खमंग भाजून घ्या.३. भरीतात हिरवी मिरची कच्ची खाल्ली तर पोटाला त्रास होऊ शकतो. म्हणून तव्यावर थोडेसे तेल टाका आणि हिरवी मिरची थोडं तेल टाकून परतून घ्या.

४. परतलेली हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्या.५. यानंतर वांग्यांची सालं काढून ते सोलून घ्या. यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार मीठ टाका आणि सगळे मिश्रण एकत्र करून ठेचून घ्या.६. ताक घुसळण्याची रवी किंवा पावभाजी स्मॅशर या कशानेही भरीत चांगले ठेचून घ्या. जेवढे जास्त भरीत ठेचले जाईल, तेवढी भरताची चव अधिक बहरत जाईल. ७. चांगले ठेचून झाल्यानंतर एखादा टेबलस्पून तेल टाका आणि सगळे भरीत पुन्हा एकदा नीट कालवून घ्या.८. या रेसिपीमध्ये तेल नाही टाकले तरी चालते. त्यामुळे ज्यांना तेल चालत नाही, त्यांच्यासाठी भरीताची ही रेसिपी बेस्ट आहे.

 

या पद्धतीनेही करू शकता भरीत१. भरीत बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. आधीच्या रेसिपीमध्ये आपण वांगे केवळ गॅसवर भाजून घेतले होते. आता या रेसिपीमध्ये सगळ्यात आधी कढईत थोडे तेल टाका. यामध्ये वाग्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी टाका आणि त्या परतून घ्या. फोडी चांगल्या परतल्यानंतर एक- दोन मिनिटे कढईवर झाकण ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी. यानंतर आधीच्या रेसिपीप्रमाणे सगळे साहित्य टाकावे आणि भरीत चांगले स्मॅश करून घ्यावे. 

 

२. भरीतासाठी वांगे गॅसवर भाजून घेताना वांग्याला थोडासा काप द्यावा. त्यामध्ये मिरच्या आणि लसूण ठेवावा आणि त्यानंतर ते भाजावे.

३. अशा कुठल्याही पद्धतीने भरीत केले तरी ते टेस्टीच होते.  

टॅग्स :अन्नपाककृतीमराठवाडा