Join us

भर पावसात नाश्त्याला करा गरमागरम पोह्याचे थालीपीठ, झटपट होणारी खमंग रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 12:02 IST

Breakfast Easy Poha Thalipith Recipe : नेहमीच्याच पदार्थांपासून पण वेगळा पदार्थ करायचा तर थोडी कल्पकता वापरावी लागते

नाश्त्याला रोज उठून काय करायचं या प्रश्नाने आपलं डोकं अनेकदा सुन्न होतं. घरात असलेल्या पदार्थांपासूनच पण तरी वेगळा आणि चविष्ट पदार्थ करायचा म्हणजे खरी कसरत असते. सकाळच्या वेळी तर आपली भलतीच घाई असल्याने झटपट होईल असं काहीतरी करायचं असतं. काही वेळा आपल्याला घरात खायला वेळ झाला नाही तर आपण डब्यात सहज नेऊ शकू असा एखादा पदार्थ आपल्याला हवा असतो. त्यात पावसाळा आला की आपल्याला खमंग आणि गरम काहीतरी खावसं वाटतं. हे पदार्थ पोटभरीचे आणि पौष्टीकही हवे असतात.

इतकं सगळं गणित जुळवून आणताना घरातील महिलांची पार तारांबळ होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असे काय करावे असा प्रश्न कायम असतो. घाईत एकतर कांदेपोहे केले जातात किंवा उपीट. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला तर वेगळा आणि तरीही नेहमीच्याच  पदार्थांपासून पण वेगळा पदार्थ करायचा तर थोडी कल्पकता वापरावी लागते. पाहूया पोह्यांपासून केल्या जाणाऱ्या खमंग थालिपीठाची सोपी रेसिपी (Breakfast Easy Poha Thalipith Recipe)...

(Image : Google)

१. आपण नेहमी पोहे करण्यासाठी जाड पोहे धुवून भिजवतो त्याचप्रमाणे पोहे थोडे जास्त पाणी १० मिनीटांसाठी भिजवून ठेवायचे. 

२. दुसरीकडे मिरची, धणे, जीरे, लसूण आणि आलं याचं मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटण करुन घ्यायचे. 

३. पोहे चांगले भिजल्यानंतर त्याचा एक लगदा तयार करुन घ्यायचा. यामध्ये डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण घालायचे. 

४. यामध्ये ओवा, तीळ, हळद, तिखट, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर कोथिंबीर घालून आवश्यक तितके पाणी घेऊन पीठ सैलसर भिजवून घ्यायचे. 

५. एक सुती कपडा ओला करुन त्यावर या पीठाचे गोळे घेऊन थालीपीठ थापून घ्यायचे. 

६. तव्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप घालून हे थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचे. 

७. हे गरमागरम थालीपीठ दही, लोणचं, सॉस किंवा अगदी नुसते खाल्ले तरी मस्त लागते. पोटभरीचे आणि डब्यात न्यायलाही हा पर्याय अतिशय चांगला आहे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.