स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी 'कढई' ही केवळ स्वयंपाक करण्यासाठीच नाही तर याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशीही जोडलेला असतो. आपण बनवणाऱ्या पदार्थांची चव, पौष्टिकता आणि आरोग्यावर होणारा परिणाम हा मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांवर अवलंबून असतो. आपण काय खातो यासोबतच आपण ते कशात शिजवतो, याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. पूर्वीच्या काळी घराघरांत लोखंडी किंवा मातीच्या भांड्यांचा वापर केला जायचा, पण बदलत्या काळानुसार आपल्या किचनमध्ये स्टील आणि ॲल्युमिनियमच्या कढईने जागा घेतली आहे(healthiest kadhai for Indian cooking).
आजकाल बाजारात लोखंडी, स्टील आणि ॲल्युमिनियम अशा विविध प्रकारच्या कढया सहज विकत मिळतात. परंतु यापैकी नेमकी कोणती कढई आरोग्यासाठी सुरक्षित आहे, कोणत्या कढईत (which kadhai is best for health) बनवलेला पदार्थ अधिक पौष्टिक होतो आणि कोणती कढई रोजच्या वापरासाठी योग्य ठरते, याबाबत अनेकींच्या मनात प्रश्न येतो. काहीजण लोखंडी कढई आरोग्यासाठी फायदेशीर मानतात, तर काहींना स्टील सोयीस्कर वाटते आणि ॲल्युमिनियम हलके व पटकन तापणारे असल्यामुळे प्रचंड लोकप्रिय आहे. पण आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने योग्य निवड कोणती? लोखंडी, स्टील आणि ॲल्युमिनियम (iron vs steel vs aluminium kadhai) कढईंचे फायदे-तोटे आणि आपल्या स्वयंपाकघरासाठी सर्वात सुरक्षित पर्याय कोणता ठरू शकतो ते पाहूयात...
स्वयंपाकासाठी सर्वात बेस्ट कढई कोणती ?
१. स्टीलची कढई :- आजच्या काळात स्टीलची कढई ही सर्वाधिक वापरली जाणारी कढई मानली जाते. यामध्ये जवळपास सर्व प्रकारचे पदार्थ अगदी सहजरित्या शिजवले जाऊ शकतात. स्टीलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अन्नाची चव किंवा त्यातील पोषक तत्वांवर कोणताही वाईट परिणाम करत नाही. म्हणजेच, भाजी किंवा डाळीमध्ये जे पोषक घटक असतात, ते तसेच टिकून राहतात. आरोग्याच्या दृष्टीने स्टीलची कढई सुरक्षित मानली जाते आणि यामध्ये रासायनिक प्रक्रियेचा (Reaction) धोकाही कमी असतो. यामध्ये आंबट किंवा मसालेदार पदार्थ सुद्धा बिनदिक्कतपणे बनवता येतात. ही कढई स्वच्छ करणे सोपे असते आणि तिला गंज लागण्याची भीतीही नसते. मात्र, यामध्ये एक उणीव अशी आहे की, जर तेल कमी असेल किंवा गॅसची आंच मोठी असेल, तर अन्नपदार्थ कढईला चिकटू शकतात. त्यामुळे यात स्वयंपाक करताना थोडे तेल आणि योग्य तापमानाची काळजी घेणे आवश्यक असते.
स्टीलची कढई कधी वापरावी :- रोजची भाजी, डाळ, हलके फ्राय किंवा फोडणी - प्रत्येक कामासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
तळणीचे पदार्थ होणार नाही तेलकट! शेफ संजीव कपूर सांगतात १ ट्रिक, तेल न पिता होतील कुरकुरीत...
२. लोखंडी कढई :- आरोग्याच्या दृष्टीने लोखंडी कढई अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामध्ये अन्न शिजवल्याने लोहाचे (Iron) काही अंश अन्नात मिसळतात, ज्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत मिळते. याच कारणामुळे जुन्या काळात बहुतांश घरांमध्ये लोखंडी कढईचाच वापर केला जात असे. लोखंडी कढई लवकर तापते आणि बराच वेळ गरम राहते, त्यामुळे यामध्ये बनवलेल्या जेवणाला एक विशिष्ट चव मिळते. विशेषतः परतलेल्या भाज्या किंवा मसालेदार पदार्थ यामध्ये अधिक चविष्ट बनतात, परंतु यामध्ये काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. टोमॅटो किंवा चिंच यांसारखे आंबट पदार्थ या कढईत जास्त वेळ ठेवल्यास धातूची चव अन्नात उतरू शकते. तसेच, लोखंडी कढई धुतल्यानंतर व्यवस्थित कोरडी करून ठेवली नाही तर तिला गंज लागण्याची शक्यता असते.
लोखंडी कढई कधी वापरावी :- सुकी भाजी, भजी, फोडणी किंवा शरीरातील लोह वाढवण्यासाठी याचा नियमित वापर करणे उत्तम आहे.
३. ॲल्युमिनियमची कढई :- ॲल्युमिनियमची कढई पूर्वी जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात पाहायला मिळायची, कारण ती वजनाला हलकी, स्वस्त आणि लवकर गरम होणारी असते. यामध्ये अन्न लवकर शिजते, त्यामुळे अनेक लोक याला सोयीस्कर मानतात. परंतु, ॲल्युमिनियमच्या भांड्यात दररोज जेवण बनवणे योग्य मानले जात नाही. स्वयंपाक करताना याचे छोटे कण अन्नात मिसळू शकतात, जे दीर्घकाळात शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. अनेक अभ्यासांमध्ये याचा संबंध मेंदू आणि शरीराशी संबंधित गंभीर आजारांच्या धोक्याशी जोडला गेला आहे. विशेषतः आंबट किंवा खारट पदार्थ ॲल्युमिनियममध्ये शिजवल्याने जास्त रासायनिक प्रक्रिया (Reaction) होते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात नाही.
ॲल्युमिनियमची कढई कधी टाळावी :- दररोजचा स्वयंपाक, विशेषतः आंबट किंवा मसालेदार पदार्थांसाठी याचा वापर टाळावा.
रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती कढई निवडावी?
जर रोजच्या सुरक्षित आणि साध्यासोप्या स्वयंपाकाचा विचार केला, तर स्टीलची कढई हा सर्वात संतुलित पर्याय मानला जातो. ही कढई टिकाऊ, स्वच्छ करायला सोपी आणि जवळपास सर्व प्रकारच्या पदार्थांसाठी योग्य आहे. जर तुम्हाला चव आणि शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढायची असेल तर किचनमध्ये लोखंडी कढई देखील नक्की ठेवा आणि तिचा वापर सुक्या किंवा परतलेल्या भाज्यांसाठी करा. आरोग्याच्या दृष्टीने ॲल्युमिनियमच्या कढईचा नियमित वापर टाळणेच फायदेशीर मानले जाते.
