मेथीची भाजी पौष्टिक आणि चवदार असते. पण अनेक वेळा तिचा कडवटपणा भाजीमधे उतरतो. (Ashad Special Food: Must-have fenugreek during Ashad, make this fenugreek vegetable that doesn't taste bitter at all)त्यामुळे मेथीची भाजी करताना काही खास काळजी घेणे गरजेचे आहे. मेथी कडवट होऊ नये आणि मस्त चविष्ट व्हावी यासाठी काही साध्या टिप्स आहेत. ज्या लक्षात ठेवायलाही सोप्या आहेत. मेथीची भाजी करताना या गोष्टी करा. भाजी अजिबात कडवट होणार नाही.
भाजी कडू होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथीची पाने योग्य रीतीने धुणे. भाजी करताना सुरुवातीला मेथीची जुनी, पिवळी, कडक किंवा डागाळलेली पाने बाजूला काढायची. भाजी नीट निवडायची. फक्त ताजी, हिरवीगार पाने निवडायची. निवडलेली पाने स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवायची. शेवटच्या वेळेस थोडं मीठ टाकून धुवायचे. त्यामध्ये असलेली कडवट चव कमी होते. काही जण भाजी धुतल्यानंतर मेथीची पाने १०-१५ मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवतात. त्यामुळे कडवटपणा अजूनच कमी होतो. भिजवलेली पाने नंतर हाताने पिळून घ्या, म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल आणि पानं थोडी मऊही होतील.
मेथीची भाजी करताना सतत ढवळायची नाही. जास्त ढवळल्यामुळे ती जास्त कडू होते. सतत ढवळ्यावर ती कडवट चव सोडते आणि भाजी एकदम कडू होऊन जाते. त्यामुळे भाजी फक्त कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची. जास्त ढवळायची नाही. मेथी जास्त वेळ वाफवायची नाही. मेथी जास्त वेळ झाकून ठेवल्यावर तिचा कडवटपणा वाढतो. त्यामुळे झाकण न ठेवता शिजवायची. नंतर शेवटी थोडावेळ झाकण ठेवा. तसेच भाजी करताना मीठ शेवटी घालायचे. मेथी आणि मीठ एकत्र फोडणीत घालायचे नाही. भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात मीठ घालायचे.
मेथीची भाजी नुसती न करता त्यात बटाट्याचे तुकडे घालू शकता. किंवा बारीक चिरलेला टोमॅटो घालू शकता. त्यांचा रस मेथीच्या पानांशी मिसळून चव सौम्य करतो आणि कडवटपणा कमी होतो. दाण्याचे कुट तसेच कांदाही घालू शकता. विशेषतः बटाट्यामुळे कडवटपणा शोषला जातो, त्यामुळे भाजी अधिक चविष्ट होते. अजून एक जुनी पण प्रभावी पद्धत म्हणजे मेथीची पाने थोडं तूप गरम करून परतून घ्या आणि मग त्याचा उपयोग भाजीसाठी करा. तुपामुळे भाजीला खमंग चव येते आणि कडवटपणा कमी होतो.
मेथीची मुळात जी चव असते ती नाहीशी करणं शक्य नाही. त्यामुळे कडवटपणा कमी व्हावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. मेथी शिजवताना चूक झाली तर तिचा कडवटपणा वाढतो. त्यामुळे या टिप्स लक्षात ठेवा.