अनेक प्रकारचे लाडू भारतात केले जातात. प्रत्येक प्रकारचा लाडू चवीला एकदम हटके असतो. (wheat flour)काही गोड खायची इच्छा झाली की आई लगेच लाडूचा डब्बा उघडते. घरोघरी विविध प्रकराचे लाडू वळले जातात. कणकेचे लाडू कधी खाल्ले आहेत का? गव्हाचे हे लाडू चवीला फारच भारी असतात. करायला अगदीच सोपे आहेत. फार काही कष्ट न घेता झटपट हे लाडू करा.
साहित्य कणिक, साखर/गूळ, बदाम, तूप, काजू
कृती१. कणिक छान चाळून घ्यायची. कणिक जेवढी घ्याल त्यापेक्षा जरा कमी साखर किंवा गूळ घ्यायचा. तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार गोडाचे पदार्थ घ्यायचे. कमी गोड असा कणिक लाडूही चांगलाच लागतो. साखर मिक्सरमधून वाटून घ्यायची. मस्त पिठीसाखर करून घ्यायची. सुकामेवा तुम्हाला आवडणारा सगळा घेऊ शकता. काजू व बदाम तर घ्याच. काजू व बदामाचे लहान तुकडे करा. पूड करू नका तुकडेच करा.
२. एका कढईत दोन चमचे तूप घ्या. तुपावर सुकामेवा छान परतून घ्यायचा. कुरकुरीत झाल्यावर एका ताटलीत काढून घ्यायचा. (wheat flour)मग त्याच कढईत आणखी दोन चमचे तूप घ्यायचे आणि कणिक घालायची. कणिक सतत ढवळा. अजिबात करपू देऊ नका कणिक करपली तर लाडूला करपट वास येतो आणि तो जात नाही. मंद आचेवर कणिक परतायची. कणकेचा रंग जरा बदलला की गॅस बंद करायचा.
३. एका खोलगट पातेल्यात परतलेली कणिक काढून घ्यायची. त्यात पिठीसाखर घालायची. पिठीसाखर आणि कणिक एकजीव करुन घ्यायची. मग त्यात थोडे वितळवलेले तूप घालायचे आणि परतलेला सुकामेवा त्यात घालायचा. सगळं छान एकजीव करायचे. मग त्याचे लाडू वळून घ्या. पीठ जरा कोमट असतानाच लाडू वळायचे. म्हणजे खमंग लागतात.
४. जर साखरेऐवजी गूळ घेत असाल तर गूळ व्यवस्थित किसून घ्यायचा. मग कणिक परतल्यावर गूळ घालायचा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. गार होण्याआधी लाडू वळायचे.