Join us
Daily Top 2Weekly Top 5

कशीही करा कारल्याची भाजी कडूच? कारल्याचा कडूपणा घालवून भाजी चविष्ट करण्याचे 5 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 20:15 IST

कसंही करा कारलं कडूच हे सत्य बदलायचं असल्यास 5 युक्त्या वापरा.. कारलं हमखास चविष्टच होणार!

ठळक मुद्देकारल्याच्या बियांमध्ये जास्त कडूपणा असतो.  कांदा, बडिशेप आणि शेंगदाणा या तीन गोष्टी कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी महत्वाच्या आहेत. 

कारलं तुपात तळा नाहीतर साखरेत घोळा ते कडूच लागणार! अशी कारल्याबाबतची म्हण प्रचलित आहेच. जेव्हा जेव्हा कारल्याची भाजी करतो तेव्हा तेव्हा भाजीतला कडूपणा  कशीही करा कारल्याची भाजी कडूच लागणार या सत्याची प्रचिती देतो.  कारल्याचा हा कडूपणाच कारलं खाण्याची इच्छा संपवून टाकतो.  

Image: Google

कारलं खाणं हे आरोग्यासाठी वरदानाप्रमाणे फायदेशीर मानलं जातं. शरीरातील सर्व अवयवांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी कारलं खाण्याला महत्व आहे. कारल्यात अ, क ही जीवनसत्वं, फायबर, लोह हे पोषक घटक असतात. कारल्यातील सर्व घटकांचा फायदा होण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश करणं गरजेचं असल्यचं आहारतज्ज्ञ म्हणतात. आरोग्य तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ कारल्याचं जे महत्व सांगतात ते योग्यच पण कारलं कडू लागतं, त्यामुळे खावंसं वाटत नाही, हे देखील सत्य आहे.

पण कारलं कडूच लागतं हे सत्य आपण बदलू शकतो. यासाठी कारलं तुपात तळण्याची आणि साखरेत घोळण्यची अजिबात गरज नाही. कारल्याची भाजी करताना काही युक्त्या वापरल्यास कारल्याचा कडूपणा कमी होवून कारल्यची भाजी आवडीनं खाल्ली जाईल अशी होते .

Image: Google

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी..

1. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारलं सोलण्यानं छिलून घ्यावं. कारल्यातील छोट्या मोठ्या बियाही काढून टाकाव्यात. कारल्याच्या बियात कडूपणा जास्त असतो. कारल्याची भाजी करताना कारलं छिलून आणि बिया काढून केल्यास कडू होत नाही. 

2. कारलं छिलून त्याचे बारीक तुकडे करावेत. एका मोठ्या पातेल्यात मीठ घालावं. त्यात कारल्याचे तुकडे घालावेत. अर्धा तास कारले मिठात ठेवल्यानंतर ते पाण्यानं स्वच्छ धुवावेत. मिठात ठेवून नंतर पाण्यानं धुवून कारल्याची भाजी केल्यास कारल्याची भाजी कडू लागत नाही.

3. कारल्याची भाजी करताना कारल्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. चिरलेल्या कारल्यात दही घालून ते नीट मिसळून घ्यावं. एक तास दह्यात कारल्याचे तुकडे ठेवल्यानंतर ते फोडणीस घातले तर कारल्याचा कडूपणा दूर होतो. 

Image: Google

4. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारलं छिलून, कापून घ्यावं. कारल्यावर थोडं मीठ आणि कणीक टाकावं. एक तासानं कारल्याचे तुकडे पाण्यानं धुवून मग फोडणीस घालावेत. 

5. कारल्याची भाजी करताना कांदा, बडिशेप आणि शेंगदाणे या घटकांचा वापर करावा. हे सर्व घटक कारल्यातील कडूपणा कमी करण्यास मदत करतात. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स