पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. जेव्हा सलग काही दिवस ढगाळ वातावरण असतं किंवा रिमझिम पाऊस सुरू असतो, तेव्हा तर तापमान आणखी खाली घसरतं. याचा परिणाम स्वयंपाक घरातल्या काही पदार्थांवरही होतोच.. उदाहरणार्थ अशा थंड दिवसांमध्ये दही लवकर विरझत नाही. जे दही उन्हाळ्यात ५ ते ६ तासांत चांगलं तयार होतं, त्यासाठी पावसाळ्यात मात्र ९ ते १० तास थांबावं लागतं. शिवाय बऱ्याचदा तर असंही होतं की एवढा जास्त वेळ घेऊन तयार झालेलं दही खूप चिकट होतं. त्याला तारा सुटतात. असं दही खाण्याची इच्छाही होत नाही. म्हणूनच पावसाळ्यातही अगदी कमी वेळेत घट्ट आणि गोड दही तयार व्हावं यासाठी या काही खास टिप्स..(3 Tips For Making Sweet, Thick Curd At Home In Monsoon)
पावसाळ्यात दही लवकर लागावं यासाठी काय करावं?
१. उन्हाळा असो किंवा पावसाळा असो ज्या दुधाचं तुम्हाला दही लावायचं असेल ते दूध थोडा वेळ उकळवून कोमट करून घ्या आणि त्यानंतरच त्याचं दही लावा.
दूध उकळलं की त्यातलं पाणी कमी होतं आणि ते थोडं आटलं जातं. अशा दुधाचं दही घट्ट होतं.
२. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं नेहमीचं कुकर घ्या. ते गॅसवर ठेवून थोडं गरम करून घ्या. या गरम झालेल्या कुकरमध्ये दही लावलेलं दुधाचं भांडं ठेवा.
आमचूर पावडर विकत घेण्यात कशाला पैसे घालवता? घ्या सोपी रेसिपी- विकतपेक्षाही भारी होईल
कुकरचं झाकण लावून ते एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा. हे कुकर वारंवार हलवू नका. कुकरमध्ये तयार झालेल्या उष्णतेमुळे दही लवकर लागेल.
३. हा एक उपायही तुम्ही करू शकता. यासाठी एक उभट भांडं किंवा डबा घ्या. त्या डब्यामध्ये दही लावलेलं भांडं ठेवा आणि आता त्या डब्यात थोडंसं गरम पाणी घाला.
डब्यावर झाकण ठेवून द्या. गरम पाण्यामुळे डब्यातलं वातावरण दह्यासाठी उबदार होईल आणि त्यामुळे योग्य वेळेत चांगलं घट्ट, गोड दही तयार होईल.