Join us  

नाश्त्याला दलिया खाण्याचे ३ फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 1:08 PM

सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा असून तो पोटभरीचा आणि पौष्टीक असणे आवश्यक असते. दलिया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्देकॅलरीचे प्रमाण कमी असते आणि प्रोटीन, लोह यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी दलिया खाणे फायद्याचे ठरते. आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळ्या पद्धतीने दलियाचे प्रकार करु शकतो.

रोज उठून नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर कायम असतो. सतत पोहे, उपीट करुन कंटाळा आला की सकाळी घाईच्या वेळात चहा-बिस्कीट खाऊन अनेक जण कॉलेज किंवा ऑफीसला बाहेर पडतात. पण सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा असून तो पोटभरीचा आणि पौष्टीक असणे आवश्यक असते. दलिया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये आपण गव्हाचा दलिया, वेगवेगळ्या डाळी आणि धान्ये एकत्र असा दलिया असे आपल्या आवडीनुसार करु शकतो. धान्ये आणि डाळी असल्याने त्यातून शरीराला आवश्यक असणारे बरेच घटक मिळतात. 

(Image : Google)

दलियामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फोलेट, पोटॅशियम, कार्बोहाइट्रेड, झिंक, मिनिरल्स, विटॅमिन्स, आयर्न, प्रोटीन, फाइबर अशी बरीच पोषक तत्वे असतात. यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होते. ज्यांना गोड खायला आवडते ते दलियाची लाबशी किंवा खीर असे गोड खाऊ शकतात. यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. यातील सुकामेवा आणि दूध यांमुळे त्याचे पोषण आणखी वाढते. याशिवाय कडीपत्ता, लसूण, लाल मिरची यांची फोडणी देऊनही हा दलिया करता येतो. तसेच घरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही भाज्या घालून हा दलिया करता येतो, ज्यामुळे त्याची चव तर वाढतेच पण पोषणही वाढण्यास मदत होते. पाहूयात दलिया खाण्याचे फायदे

१. पचनशक्ती सुधारते व एनर्जी मिळते

तुम्हाला पचनाशी संबंधित तक्रारी असतील तर दलियाचा आहारात आवर्जून समावेश करावा. यामध्ये प्रामुख्याने अर्धवट दळलेले धान्य असल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि पचनाचे काम सुरळीत होण्यास मदत होते. गॅसेस, पोट फुगणे अशा समस्या असतील तर पोट साफ होण्यासाठी दलिया खाणे फायदेशीर ठरते. यातील पोषक घटकांमुळे शरीराला पोषण मिळते व ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

२. हृदयरोग

दलियामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित तक्रारी आहेत अशांनी दलिय़ाचा आहारात आवर्जून समावेश करावा. म्हणजे हृदयरोगाशी संबंधित तक्रारी उद्भवत नाहीत. 

(Image : Google)

३. डायबिटीस आणि लठ्ठपणा 

डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. दलियामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस असतात, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि प्रोटीन, लोह यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी दलिया खाणे फायद्याचे ठरते. 

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.