Lokmat Sakhi >Fitness > World Bicycle Day 2025: सायकल सखी! जगणं स्ट्रेस फ्री आणि आनंदी करणारी जादू आयुष्यात हवीच..

World Bicycle Day 2025: सायकल सखी! जगणं स्ट्रेस फ्री आणि आनंदी करणारी जादू आयुष्यात हवीच..

World Bicycle Day 2025 Benefits of Cycling: सायकल रोज चालवणं अत्यंत आनंददायी असतं, जगण्याला नवी ताकद देणारी दोस्ती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 15:51 IST2025-06-03T15:36:00+5:302025-06-03T15:51:16+5:30

World Bicycle Day 2025 Benefits of Cycling: सायकल रोज चालवणं अत्यंत आनंददायी असतं, जगण्याला नवी ताकद देणारी दोस्ती.

World Bicycle Day 2025: Life is stress-free and magical with a bicycle! change your life with cycling. | World Bicycle Day 2025: सायकल सखी! जगणं स्ट्रेस फ्री आणि आनंदी करणारी जादू आयुष्यात हवीच..

World Bicycle Day 2025: सायकल सखी! जगणं स्ट्रेस फ्री आणि आनंदी करणारी जादू आयुष्यात हवीच..

Highlightsमाझी अशी अनोखी सखी म्हणजे माझी सायकल! या सखीने मला निसर्गाच्या अगदी जवळ नेले, व्यायामाची एक वेगळी आवड तयार केली.

डॉ. राहुल सोनवणी (रेडिओलॉजिस्ट)

माझी अनोखी सखी. असं लेखाचं शीर्षक मला सुचलं होतं पण ते लिहिताना जरा बुचकळ्यात पडलो. म्हटले आमच्या अर्धांगिनी जेव्हा हे शीर्षक वाचतील तेव्हा माझी खैर काढल्याशिवाय काही राहणार नाहीत. पण नक्की सांगतो जेव्हा त्या हा लेख पूर्ण वाचतील, त्यांना देखील अशी एक अनोखी सखी त्यांच्या आयुष्यामध्ये असायला हवी असे नक्की वाटेल, फार आवडेल! आता तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेबांना ही कुठली नवी सखी भेटली? सांगतो सगळे सविस्तर सांगतो.. (world bicycle day 2025 )

माझी अशी अनोखी सखी म्हणजे माझी सायकल! या सखीने मला निसर्गाच्या अगदी जवळ नेले, व्यायामाची एक वेगळी आवड तयार केली, वेगवेगळ्या क्षेत्रातील, वयातील मित्र मिळवून दिले, एक अल्ट्रासायकलिस्ट म्हणून वेगळा दर्जा मिळवून दिला. साधारण सहा वर्षांपूर्वी दररोज ५ किलोमीटर सायकल चालवत सुरु झालेला हा माझा सायकल प्रवास आता तब्बल १५०० किलोमीटर एका दमात करण्या पर्यंत येऊन पोहोचला आहे.

या सहा वर्षाच्या कालावधीत या सायकलने मला बरेच काही शिकवले. वैद्यकीय क्षेत्रातील रोजच्या ताणतणावाच्या लाईफपासून लांब एक आनंदी विश्व तयार करून दिले. शरीराला एक शिस्त लावायला मदत केली. दररोज सकाळी उठून मित्रांबरोबर सायकलिंगला जाण्याच्या  छंदामुळे नाशिकसारखं निसर्गरम्य शहर आणि अवतीभवतीचा परिसर अगदी जवळून पाहता आले.
कुठल्याही प्रकारचे इंधन न वापरता पर्यावरणपूरक आमची सायकल वारी परदेशापर्यंत जाऊन पोहोचली. या प्रवासात जसे उत्कृष्ट सायकलिस्ट मित्र भेटले त्याचप्रमाणे आमच्या खांद्याला खांदा लावून सायकलिंग करणाऱ्या काही मैत्रिणी देखील भेटल्या. मी जेव्हा त्यांना सायकलिंग करताना बघायचो तेव्हा एक नवलच वाटायचे की आपला प्रपंच, व्यवसाय, कुटुंब सांभाळून या रणरागिनी जेव्हा शेकडो किलोमीटर आमच्याबरोबर सायकलिंग करायच्या तेव्हा मला शिवरायांच्या हिरकणीची आठवण नक्की व्हायची. हात जोडून नक्कीच त्यांना नमन करावेसे वाटायचे.

नाशिक सायकल परिवारामध्येदेखील मी बऱ्याच क्षेत्रातील, वयोगटातील स्त्रियांना वेगवेगळ्या थरातील सायकलिंग करताना बघत आलो आहे. चूल-मूल या चौकटीच्या बाहेर पडून सायकल छंद जोपासताना बघितले.
रोज सकाळी फेरफटका म्हणून कोणी सायकलिंग करतात, तर कोणी हा छंद एका वेगळ्या स्तरावर नेऊन आपल्या शहराचे नाव मोठे केले. अशाच काही फिमेल सायकलिस्टने परदेशात कठोर सायकलिंग करून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तर काहींनी यंगेस्ट आयर्न वुमन ऑफ इंडिया सारखे किताब पटकावले. सार्थ अभिमान वाटतो या सगळ्यांचा.

आमच्या घरातलंच एक उदाहरण सांगतो. पंढरपूर वारी करायची इच्छा आमच्या अर्धांगिनींची होती, पण सायकल मात्र चालवता येत नव्हती. जिद्दीला पेटलेल्या त्या मला म्हणाल्या वारी तर मी करणारच! तू मला सायकल शिकव किंवा नको. मग काय सायकल शिकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊनच त्यांनी पूर्ण केला. 
सांगायचे तात्पर्य असे, जेव्हा एखादी स्त्री एखादी गोष्ट करायचे मनामध्ये ठरवते तर तिला कोणीच रोखू शकत नाही. नारीशक्तीला कुठली मर्यादा नाही असे म्हणतात ना ते खरेच!

सायकलिंगचे फायदे

वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे सायकलिंगचे बरेच फायदे मी माझ्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रीण, काका-काकू,आजोबा-आजी आणि शाळकरी मुले यांना समजावू शकलो. काही नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन कामासाठी जरी तुम्ही ही सायकल वापरली तरी तुम्हाला त्याचे फायदे नक्की जाणवतील.
नियमित सायकलिंग चे अनेक फायदे आहेत.
मानसिक फायदे: ताणतणाव कमी होणे, मानसिक स्पष्टता, मूड सुधारणे.
शारीरिक फायदे: हृदयाचा उत्तम व्यायाम, स्नायू बळकट होणे, जॉईंट्स मजबूत होणे. त्याचबरोबर सांघिक क्षमता वाढणे.

या लेखाद्वारे मी सगळ्याच महिलांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही देखील प्रयत्न करा आणि अशी सायकल सखी जवळ करा. ती तुम्हाला शारीरिक, मानसिक ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी ती नक्की मदत करेल.
मग काय या जागतिक सायकल दिनाचे (World Bicycle Day 2025) औचित्य साधून धरा हँडल.. मारा पेडल!
हम फिट तो इंडिया फिट!

डॉ. राहुल सोनवणी (रेडिओलॉजिस्ट)
वरद इमेजिंग सेंटर, कॉलेज रोड, नाशिक.

Web Title: World Bicycle Day 2025: Life is stress-free and magical with a bicycle! change your life with cycling.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.