Join us
Daily Top 2Weekly Top 5

वजन वाढताच ब्रेस्ट साइजही वाढली, बेढब दिसताय? सुरेख सुडौल बांध्यासाठी 3 आसनं फायदेशीर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 17:15 IST

योगासनातील सेतूबंधासन, धनुरासन आणि ताडासन ही तीन आसनं नियमित केल्यास वाढलेल्या, बेढब झालेल्या स्तनांचा आकार कमी करता येतो. शरीर सुडौल करण्याचे सोपे व्यायाम

ठळक मुद्देस्तनांचा आकार कमी करंण्यासाठी सेतूबंधासन हे फायदेशीर आसन मानलं जातं.धनुरासन नियमित केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.बांधा सुडौल करण्यासाठी नियमित ताडासन केल्यास फायदा होतो. 

वजन वाढलं की त्याचा परिणाम स्तनांच्या आकारावरही होतो. स्तनांचा आकार वाढल्यास शरीराच्या बांधा सुडौल दिसत नाही. तसेच वाढलेल्या स्तनांमुळे हालचाली करण्यास अडचणी, स्तनांमध्ये वेदना जाणवतात.

Image: Google

व्यायामाद्वारे स्तनांचा आकार कमी करणं सहज शक्य आहे. योगासनातील सेतूबंधासन, धनुरासन आणि ताडासन ही तीन आसनं नियमित केल्यास वाढलेल्या, बेढब झालेल्या स्तनांचा आकार कमी करता येतो. 

Image: Google

सेतूबंधासन

स्तनांचा आकार कमी करंण्यासाठी सेतूबंधासन हे फायदेशीर आसन मानलं जातं. सेतूबंधासनामुळे स्नायुंचा व्यायाम होतो. सेतूबंधासन नियमित केल्यास पोटांच्या स्नायुंवर सकारात्मक परिणाम होवून पचन व्यवस्था सुधारते. 

सेतूबंधासन करण्यासाठी जमिनीवर पाठ टेकवून जमिनीवर झोपावं. दोन्ही पायात भरपूर अंतर ठेवून शवासन् करावं.  नंतर दोन्ही पाय एकमेकास जोडावेत. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून नितंबांजवळ आणावेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे घट्ट पकडावेत. श्वास आत घेत नितंब जमिनीपासून जास्तीत जास्त वर ऊचलावेत. हे आसन करताना शरीराचा आकार सेतूसारखा/ पुलासारखा होतो. त्यामुळे याला सेतूबंधासन असं म्हणतात.

Image: Google

सेतूबंधासन करताना डोकं आणि खांदे जमिनीला टेकलेले हवेत. गुडघे आणि पाय सरळ रेषेत असावेत. गरज वाटल्यास हातांनी कमरेला आधार देता येतो. या आसनात श्वास रोखून धरु नये. मंद श्वसन सुरु ठेवावं. अर्धा मिनिटं या आसनात राहिल्यानंतर श्वास सोडत नितंबं जमिनीवर टेकवावेत. पायांचे घोटे सोडून पुन्हा शवसनात यावं. 

Image: Google

 धनुरासन

धनुरासन नियमित केल्यास शरीराचा आकार बांधेसूद होण्यासाठी फायदा होतो. हे आसन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. छातीच्या आणि फुप्फुसांच्या स्नायुंसाठी धनुरासन फायदेशीर मानलं जातं. हे आसन नियमित  केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकली जातात. हार्मोन्सच्या संतुलनासाठी धनुरासन करणं महत्वाचं मानलं जातं.

Image: Google

धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपावं. दोन्ही पायात थोडं अंतर ठेवावं. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडावेत. पायाचे घोटे हातानं पकडावेत. हात आणि पाय वरच्या दिशेने खेचावेत. नजर छताकडे ठेवत मान करावी. छाती आणि पोट ताणावं. अर्धा ते एक मिनिट या आसनात राहिल्यानंतर आसन सोडावं. मध्ये दहा सेकंदांचा विराम घेऊन दोन ते तीन वेळा  हे आसन करावं. 

ताडासन

ताडासन नियमित केल्यानं स्नायू आणि हाडं मजबूत होतात. स्तनांचा आकार कमी करण्यासाठी ताडासन फायदेशीर आहे.  बांधा सुडौल करण्यासाठी ताडासनाचा फायदा होतो. 

ताडासन करण्यासाठी आधी ताठ उभं राहावं. दोन्ही पाय एकमेकांच्याजवळ ठेवावेत. दोन्ही हात शरीराला लागून ताठ ठेवावेत. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यावेत. दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून वरच्या दिशेने खेचावीत. नजर सरळ रेषेत स्थिर ठेवावी.

Image: Google

ताडासन करताना नजरेचा केंद्रबिंदू हलू देऊ नये. हलल्यास शरीराचा तोल जाऊन ताडासन नीट होत नाही. दीर्घ श्वास घेत हात , खांदे आणि छाती वरच्या दिशेने ओढून ताठ करावेत.टाचा उचलून पंज्यांवर उभं राहावं. अर्धा ते एक मिनिट शरीर ताठ खेचलेल्या स्थितीतच ठेवावं. आसन सोडताना श्वास सोडत पाय जमिनीला टेकवावेत. हात खाली आणावेत. किमान दहा वेळा ताडासन करुन शरीर वरच्या बाजूस खेचल्यास त्याचा परिणाम बांधा सुडौल होण्यासाठी आणि स्तनांचा आकार कमी होण्यासाठी होतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सस्तनांची काळजीब्यूटी टिप्सयोगासने प्रकार व फायदे